Kedarnath Story Mahabharata: भक्ती, शक्ती आणि निसर्गाचा अद्भुत संगम असलेल्या एका पवित्र स्थानाची ओढ दरवर्षी लाखो भाविकांना हिमालयाच्या कुशीत खेचून नेते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे हे धाम केवळ त्याच्या उंचीसाठी नाही, तर तिथल्या शिवलिंगाच्या अनाकलनीय आकारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. सर्वसाधारणपणे शिवलिंग गोलाकार असतात, मात्र इथलं शिवलिंग चक्क त्रिकोणी आकाराचे आहे. या अनोख्या आकारामागे दडलंय महाभारताच्या काळातील एक थरारक रहस्य, जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
हे पवित्र स्थान म्हणजे उत्तराखंडमधील केदारनाथ धाम. समुद्रसपाटीपासून प्रचंड उंचावर वसलेल्या या मंदिराचे दरवाजे नुकतेच भाविकांसाठी उघडले असून, या त्रिकोणी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे.
पांडव, बैल आणि भगवान शिव : नेमकं रहस्य काय?
केदारनाथमधील शिवलिंगाच्या त्रिकोणी आकाराचा संबंध थेट पांडवांशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार, महाभारताच्या युद्धानंतर पांडव आपल्या हातून घडलेल्या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवाला शोधत हिमालयात आले. मात्र, महादेव त्यांच्यावर प्रसन्न नव्हते आणि त्यांना दर्शन देऊ इच्छित नव्हते. पांडवांना टाळण्यासाठी शिवाने बैलाचे रूप धारण केले आणि ते इतर गुरांच्या कळपात शिरले.
हुशार पांडवांनी त्यांना ओळखले, तेव्हा भीमाने आपले विशाल रूप धारण करून बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भगवान शिव बैल रूपात जमिनीच्या आत गडप होऊ लागले. भीमाने धावत जाऊन बैलाची पाठ पकडली, पण शिव गुप्त झाले. या संघर्षात बैलाच्या पाठीचा जो भाग (कुबड) तिथे शिल्लक राहिला, त्याचेच रूपांतर एका शिळेत झाले. आज केदारनाथमध्ये याच त्रिकोणी आकाराच्या शिळेची 'शिवलिंग' म्हणून पूजा केली जाते.
( नक्की वाचा : 60 फूट खोल खड्डा आणि 50 तासांचा थरार! 20 वर्षांपूर्वी मृत्यूला हरवणारा Borewell Boy 'प्रिन्स' आता काय करतो? )
पंच केदार आणि पशुपतिनाथचा संबंध
भगवान शिवाच्या शरीराचे इतर भाग हिमालयातील वेगवेगळ्या 5 ठिकाणी प्रकट झाले, ज्याला 'पंच केदार' म्हटले जाते. शिवाची बाहू तुंगनाथ येथे, चेहरा रुद्रनाथ येथे, नाभी मदमहेश्वर येथे आणि जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्याची मान्यता आहे. विशेष म्हणजे, ज्या बैलाचे धड केदारनाथमध्ये आहे, त्याचे मस्तक नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरात प्रकट झाल्याचे मानले जाते. या दोन मंदिरांना जोडणारी ही कथा आजही भाविकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे.
केदारनाथचे मंदिर वर्षातील केवळ 6 महिने भाविकांसाठी खुले असते. हिवाळ्यात उणे तापमानामुळे आणि मुसळधार हिमवृष्टीमुळे इथला संपर्क तुटतो. या काळात भगवान केदारनाथांची चल मूर्ती उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात हलवली जाते. हिवाळ्यातील 6 महिने तिथेच पूजा केली जाते. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी आणि हिमालयातील या दिव्य ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी केदारनगरीत पाहायला मिळते.
स्पष्टीकरण : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. वाचकांपर्यंत ही माहिती पोहचवणे हाच आमचा यामधील हेतू आहे. NDTV नेटवर्क याची पृष्टी करत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world