How To Test Pure Jaggery: हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक डाएटमध्ये गुळाचा समावेश करतात, जे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. पण बाजारामध्ये मिळणारा गूळ शुद्ध आहे की भेसळयुक्त, हे कसे ओळखायचे? नफा मिळवण्याच्या नादात बहुतांश दुकानदार भेसळयुक्त गुळाची विक्री करतात. अशा पद्धतीचा गूळ खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची हानी टाळण्यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या टिप्स जाणून घेऊया...
गुळाचा रंग पाहून ओळखा
सर्वप्रथम गुळाचा रंग काळजीपूर्वक पाहा आणि कायम गडद रंगाचा गूळ खरेदी करावा. पंकज भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या गुळावर रासायनिक पद्धतीची शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. तर गडद तपकिरी रंगाचा गूळ नैसर्गिक आणि शुद्ध असतो. गडद रंगाचा गूळ उसाच्या रसापासून जास्तीच्या प्रक्रिया न करता तयार केले जातो, ज्यामुळे यातील पोषणमूल्य टिकून राहतात.
गुळाची चव
गुळाची चव हलकीशी खारट असेल तर गूळ जुना आहे, हे लक्षात घ्या. वेळेनुसार गुळातील खनिजांची चव खारट होऊ लागते. परिणामी गुळातील पोषणमूल्य कमी होऊ लागतात. म्हणून गुळाची चव गोड असेल आणि गूळ ताजा असेल तर चव खारट लागत नाही.
(नक्की वाचा: तीळ, भोपळ्याच्या बिया, अळशी... कोणत्या बिया कोणत्या वेळेस खाव्या? न्युट्रिशनिस्टने सांगितलं कधी मिळतील सर्वाधिक फायदे)
गुळाचा कठोरपणा
गूळ सहजरित्या हाताने तोडता आल्यास किंवा मऊ लागल्यास यामध्ये केमिकलचा समावेश आहे, हे ओळखा. शुद्ध गूळ कठोर असतो हातानं सहजासहजी कुस्करता येत नाही, यासाठी मेहनत करावी लागते.
या तीन टिप्स फॉलो करून तुम्हाला शुद्ध गुळाची निवड करणं सोपे जाईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)