LinkedIn Profile Trick: लिंक्डइनवर 'Open to Work' चा हिरवा बॅज लावून आणि शेकडो कंपन्यांमध्ये अप्लाय करूनही जर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येत नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने नोकरी गमावल्यानंतर नोकरी शोधण्यासाठी प्रचंड संघर्ष केला, पण त्याला यश येत नव्हते. अखेर त्याने डोके लावले आणि आपल्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये एक असा हुशारीचा बदल केला, ज्यानंतर कंपन्यांचे रिक्रूटर्स स्वतःहून त्याच्या मागे धावू लागले.
या एका छोट्या ट्रिकमुळे त्याला अवघ्या 2 आठवड्यांत तब्बल 2 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 1.89 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी करोडपती बनून आता रिटायरमेंटची तयारी करणाऱ्या या इंजिनिअरची ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'ती' युक्ती ठरली गेमचेंजर
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या कार्लोस सँटाना रोल्डन या सॉफ्टवेअर इंजिनिअरची टेक इंडस्ट्रीमधील मंदीमुळे अचानक नोकरी गेली होती. नोकरी गेल्यानंतर इतर सुशिक्षित बेरोजगारांप्रमाणेच कार्लोसनेही आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर 'Open to Work' चा बॅज लावला. मात्र, अनेक दिवस उलटूनही त्याला एकाही मोठ्या कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले नाही.
रिक्रूटर्स आपल्या प्रोफाइलकडे दुर्लक्ष करत असल्याचे कार्लोस यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी एक नामी युक्ती शोधली. त्यांनी प्रोफाइलवरून तो बॅज तातडीने हटवला आणि प्रोफाइलच्या हेडलाईनमध्ये स्वतःला आपल्याच एका साईड बिझनेसच्या बुकिंग सॉफ्टवेअरचा 'फाउंडर' म्हणून घोषित केले. हा बदल करताच चमत्कार झाला. जे रिक्रूटर्स आधी भाव देत नव्हते, तेच आता स्वतःहून मेसेज करू लागले आणि अवघ्या दोन आठवड्यांत त्यांना एका बड्या म्युझिक कंपनीत कोट्यवधींचे पॅकेज मिळाले.
( नक्की वाचा : VIDEO: 12 वी नंतर शिक्षण लगेच थांबवा; दिग्गज गुंतवणूकदाराचा देशातील तरुणांना खळबळजनक सल्ला, कारणही सांगितलं )
कसे बदलले नशीब?
मेक्सिकोमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कार्लोसला सुरुवातीला महिन्याला अवघे 800 ते 1500 डॉलर म्हणजेच सुमारे 75700 ते 1.42 लाख रुपये मिळत असत. 2013 मध्ये तो अमेरिकेत आला आणि त्याने डिज्नी, एबीसी न्यूज आणि स्नॅप (Snap) सारख्या कंपन्यांमध्ये काम केले. वर्ष 2020 मध्ये तो स्नॅप कंपनीत रुजू झाला, तेव्हा कंपनीने त्याला पगारासोबतच चार वर्षांसाठी 2.25 लाख डॉलरचे शेअर्स दिले होते.
त्यावेळी कंपनीच्या एका शेअरची किंमत जवळपास 12.50 डॉलर होती, जी पुढच्याच वर्षी थेट 80 डॉलरवर पोहोचली. शेअर्सच्या किमतीत झालेल्या या प्रचंड वाढीमुळे 2021 मध्ये कार्लोसची एका वर्षाची एकूण कमाई 4.2 लाख डॉलर म्हणजेच तब्बल 3.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली होती.
( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
साईड बिझनेसचा मोठा आधार
अचानक मिळालेल्या या मोठ्या पैशांचा कार्लोसने अजिबात गैरवापर केला नाही. त्याने मेक्सिकोमध्ये पर्यटकांसाठी 'केबिन रेंटल बिझनेस' म्हणजेच रिसॉर्टसारखे केबिन भाड्याने देण्याचा साईड बिझनेस सुरू केला. जेव्हा मंदी आली आणि कार्लोसची मुख्य नोकरी गेली, तेव्हा अमेरिकेसारख्या महागड्या देशात कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी मेक्सिकोमधील याच केबिन बिझनेसच्या साईड इनकमने त्याला सर्वात मोठा आधार दिला.
38 व्या वर्षी घेणार निवृत्ती
गेली 20 वर्षे सातत्याने कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून कोडिंग केल्यामुळे कार्लोसच्या डोळ्यांना आता मोठा त्रास होऊ लागला आहे. सततच्या स्क्रीन टाईममुळे तो आता या कामाला पूर्णपणे कंटाळला असून सध्या मिळालेली नोकरी ही त्याची शेवटची नोकरी असेल असे तो सांगतो. मेक्सिकोमध्ये आणखी फक्त एक रेंटल केबिन तयार करण्याचा त्याचा विचार आहे.
त्यानंतर या व्यवसायातून त्याला इतके नियमित उत्पन्न मिळत राहील की तो वयाच्या 38 व्या वर्षी कोडिंगमधून पूर्णपणे निवृत्त होईल. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र (Financially Independent) होऊन उर्वरित आयुष्य आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत आनंदात घालवण्याचा त्याचा प्लॅन आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world