Magh Gupt Navratri 2026 January: माघ महिन्यातील गुप्त नवरात्री उत्सव, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजा विधी वाचा

Magh Gupt Navratri 2026 Shubh Muhurat:​ गुप्त नवरात्रीच्या उत्सवास आजपासून शुभारंभ होतोय. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीचे महत्त्व काय आहे? देवीच्या कोणत्या रुपांची पूजा केली जाते? यासह सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Gupt Navratri 2026: माघ गुप्त नवरात्रीची पूजा विधी, नियम आणि धार्मिक महत्त्व"
Canva

Gupt Navratri 2026 January: सनातन परंपरेनुसार माघ महिन्यातील गुप्त नवरात्री शक्तीची साधना करण्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. 10 महाविद्या काली, तारा, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या देवींच्या साधना-आराधनेचा हा उत्सव यंदा 19 जानेवारी 2026 पासून ते 27 जानेवारी 2026 पर्यंत साजरा केला जाईल. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीत देवीच्या दिव्य रूपांची गुप्त पद्धतीने पूजा केल्यास विशेष फलप्राप्ती होते, असे म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर करावी? गुप्त नवरात्री पूजेचे नियम आणि धार्मिक महत्त्व याविषयी श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पौरोहित विभागाचे प्राध्यापक पं. रामराज उपाध्याय यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया.

माघ गुप्त नवरात्री कधीपासून ते कधीपर्यंत साजरी केली जाईल? (Magh Gupt Navratri Dates)

माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीचा उत्सव 19 जानेवारी 2026 पासून ते 27 जानेवारी 2026 पर्यंत साजरा केला जाईल. 

माघ गुप्त नवरात्रीतील घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Magh Gupt Navratri Shubh Muhurat)

19 जानेवारी 2026, सोमवार
वेळ : सकाळी 6.43 वाजेपासून ते सकाळी 10:24 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.

माघ गुप्त नवरात्री घटस्थापनेसाठीचा अभिजीत मुहूर्त (Magh Gupt Navratri Abhijit Muhurat)

19 जानेवारी 2026, सोमवार
वेळ : सकाळी 11:52 वाजेपासून ते दुपारी 12:36 वाजेपर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. 

गुप्त नवरात्रीची पूजा विधी (Magh Gupt Navratri Puja Vidhi)

  • गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी घर स्वच्छ करून पहाटे स्नान करून ईशान्य दिशेला चौरंग मांडवा.
  • चौरंगावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. शारदीय आणि चैत्र नवरात्रीप्रमाणेच गुप्त नवरात्रीतही कलश स्थापना करावी.
  • देवी पूजा आणि व्रतास प्रारंभ करण्यासाठी कलश स्थापना केल्यानंतर देवीला लाल रंगाची चुनरी आणि लाल रंगाची फुले अर्पण करावी. 
  • आसन, वस्त्र अर्पण करून पुष्प, चंदन, रोळी, धूप आणि दीप इत्यादी गोष्टींचा पूजा सामग्रीत समावेश करून विधिवत पूजा करावी.
  • कलश स्थापना करताना दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. शक्य नसल्यास देवीच्या कोणत्याही मंत्राचा श्रद्धेने जप करावा. 
  • पूजा झाल्यानंतर देवीला लवंग आणि बताशे यांचा विशेष नैवेद्य अर्पण करावा. 
  • गुप्त नवरात्रीत दररोज संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून मंत्रजप किंवा भजन करावे.

माघ गुप्त नवरात्रीच्या पूजेचे नियम (Magh Gupt Navratri Puja Niyam)

पं. रामराज उपाध्याय यांच्या मते, नवरात्रौत्सवात देवीपूजेसाठी जे नियम लागू असतात, तेच नियम गुप्त नवरात्रीतही लागू होतात.

  • भाविकांनी संपूर्ण नऊ दिवस नियम-संयमाने देवीची साधना करावी.

  • आहार-विहारात संयम ठेवावा.
  • दररोज देवीपूजेत कवच, स्तोत्र इत्यादींचे पठण शक्य असल्यास करावे. शक्य नसेल तर श्रद्धेने भजन, कीर्तन आणि जप करावा.
  • गुप्त नवरात्रीत तामसिक पदार्थांचा वापर करू नये.
  • केवळ सात्त्विक आहार आणि फळांचे सेवन करावे.
  • नेहमी स्वच्छ वस्त्रे परिधान करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे.
  • साधना नेहमी लाल रंगाच्या लोकरीच्या आसनावर बसून करावी.
  • साधना करताना राग करू नये आणि पूर्ण मनोयोगाने देवीचे ध्यान करावे.
  • शक्य असल्यास दररोज एका कन्येचे पूजन करावे.
  • गुप्त नवरात्रीत 10 महाविद्यांची विशेष साधना केली जाते; ती शक्य नसेल तर नऊ देवींची पूजा केली तरी ती देवी दुर्गेलाच अर्पित मानली जाते.
गुप्त नवरात्रीचे धार्मिक महत्त्व  (Magh Gupt Navratri Significance)
  • हिंदू मान्यतेनुसार गुप्त नवरात्रौत्सव तंत्र, मंत्र आणि यंत्र सिद्धीसाठी अत्यंत फलदायी पर्व मानले जाते. 
  • देवीच्या 10 रूपांची साधना जितक्या गुप्तपणे केली जाते, तितके अधिक पुण्य साधकाला प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
  • सनातन परंपरेनुसार गुप्त नवरात्री साधना सर्व कष्ट दूर करून इच्छापूर्ती करणारी मानली जाते. या काळात भाविक विशेषतः गुप्त सिद्धी प्राप्त करण्यासाठी साधना करतो.
  • गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, कारण या दिवशी वसंत पंचमीच्या निमित्ताने विद्येची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते. 
  • हा पर्व हिवाळ्यानंतर वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीकही मानला जातो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)