- डॉ. छाया वजा, इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, मुंबई
Acholuric Jaundice News: प्रसिद्ध मराठमोळा रीलस्टार प्रथमेश कदम याच्या अकाली झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. प्रथमेश कदमच्या आईने दिलेल्या माहितीनुसार त्याला पांढऱ्या काविळीची लागण झाली होती. पांढरी कावळी म्हणजे नेमकं काय? हा आजार कोणत्या कारणांमुळे होतो? जाणून घेऊन डॉ. छाया वजा यांनी दिलेली माहिती.
पांढरी कावीळ शरीरातील यकृत, पित्ताशय किंवा रक्ताशी संबंधित बिघाडामुळे निर्माण होणारी एक गंभीर स्थिती आहे. शरीरात बिलीरुबिन या पिवळ्या रंगद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांचा पांढरा भाग आणि नखे पिवळी दिसू लागतात. वेळेवर उपचार न केल्यास कावीळ पांढऱ्या काविळीचे स्वरूप धारण करून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण करू शकते.
पांढऱ्या काविळीची लक्षणे | White Jaundice Symptoms
पांढऱ्या काविळीमध्ये सुरुवातीला सौम्य लक्षणे दिसतात; पण दुर्लक्ष झाल्यास ही लक्षणे तीव्र होतात. डोळे आणि त्वचा गडद पिवळी होणे, लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होणे, शौचाचा रंग फिकट होणे, सतत थकवा जाणवणे, भूक न लागणे, मळमळणे, उलटी होणे, पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होणे, अंगाला खाज येणे आणि ताप येणे अशी लक्षणे आढळतात. गंभीर अवस्थेत रुग्णाला गोंधळ, जास्त झोप येणे किंवा बेशुद्धावस्था देखील येऊ शकते.
पांढरी कावीळ होण्यामागील कारणे | White Jaundice Causes
पांढरी कावीळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यकृताशी संबंधित कारणांमध्ये हेपेटायटिस A, हेपेटायटिस B, हेपेटायटिस C किंवा हेपेटायटिस E यासारखे विषाणूजन्य संसर्ग, अति मद्यपान, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस तसेच काही औषधांचे दुष्परिणाम यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. पित्तनलिकेमध्ये अडथळा निर्माण झाल्यास म्हणजे पित्ताशयातील खडे, पित्तनलिकेत सूज किंवा गाठ येणे तसेच स्वादुपिंडाचा कर्करोग यामुळेही शरीरात कावीळ वाढू शकते. काही वेळा रक्तपेशी मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्यास किंवा आनुवंशिक रक्तविकार असल्यास कावीळची समस्या उद्भवू शकते.
(नक्की वाचा: Prathamesh Kadam Death News: रीलस्टार प्रथमेश कदमने आत्महत्या केली? आईने रडत रडत सांगितलं मृत्यूचं धक्कादायक सत्य)
पांढरी कावळीपासून बचाव करण्यासाठी काय करावे? | White Jaundice Newsसफेद कावीळचे अचूक निदान करण्यासाठी विविध तपासण्या करणे आवश्यक असते. यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT), बिलिरुबिन तपासणी (टोटल, डायरेक्ट व इंडायरेक्ट), SGOT, SGPT, ALP, CBC तसेच हेपेटायटिससाठी विशेष रक्ततपासण्या केल्या जातात. यकृत आणि पित्ताशयाची स्थिती पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड, तर गरज भासल्यास CT स्कॅन किंवा MRI देखील करण्यात येते. कावीळ गंभीर होऊ नये यासाठी योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दारू पिणे पूर्णपणे टाळणे, बाहेरचे खाद्यपदार्थ, तेलकट खाद्यपदार्थ खाणे टाळावे, स्वच्छ आणि उकळलेले पाणी प्यावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे न घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. संसर्गजन्य कावीळ टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळणेही तितकेच गरजेचे आहे.
पांढऱ्या काविळीवरील उपचार हे तिच्या कारणांवर अवलंबून असतात. विषाणूजन्य हेपेटायटिसमध्ये विश्रांती आणि औषधोपचार केले जातात. पित्ताशयातील खडे किंवा अडथळा असल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. रुग्णाची अवस्था गंभीर असल्यास रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जातात. काही अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय ठरू शकतो. घरगुती उपायांवर अवलंबून राहणे या अवस्थेत धोकादायक ठरू शकते.
प्रथमेश कदमच्या आईने सांगितलं मृत्यूचं कारण
वेळीच उपचार न केल्यास वाईट काविळीमुळे लिव्हर फेल्युअर, मेंदूवर परिणाम (हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी), रक्तस्त्राव, संसर्ग वाढणे तसेच जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काविळीची कोणतीही लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )