Mauni Amavasya 2026: पौष महिन्यातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या असेही म्हणतात. सनातन धर्मामध्ये हा दिवस अत्यंत विशेष मानला जातो. या दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, दान-पुण्य करतात आणि मौन व्रत धारण करतात. हा दिवस देवीदेवतांसोबत पितरांच्या पूर्वजांच्या आराधनेसाठीही अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी आहे.
मौन धारण करणे हे सर्वांत मोठे तप मानले जाते, कारण त्यामुळे मन शांत होते, विचार संयमित राहतात आणि आत्मचिंतन वाढते. मौन पाळल्याने वाणीची शुद्धी होते, पापांचा नाश होतो तसेच आध्यात्मिक विकास, मानसिक शांतता, आरोग्य आणि ज्ञानाची प्राप्ती होते;असे म्हणतात. हे व्रत पितरांची कृपा मिळवण्यासाठी आणि पितृदोष निवारणासाठी विशेष फलदायी मानले जाते.
मौनी अमावस्या 2026 तिथी | Mauni Amavasya 2026 Tithi
मौनी अमावस्या तिथी प्रारंभ वेळ (Amavasya Tithi Start Time) : 18 जानेवारी उत्तररात्री 12.04 (AM) वाजता, रविवारी
मौनी अमावस्या तिथी समाप्त वेळ (Amavasya Tithi End Time) : 19 जानेवारी उत्तररात्री 1.21 (AM) वाजता, सोमवारी
कोणत्या काळात शुभ कार्य करणे टाळावे?
- पंचांगानुसार 18 जानेवारी रोजी मौनी अमावस्या आहे. अमावस्या तिथी 18 जानेवारी उत्तररात्री सुरू होणार असून 19 जानेवारी उत्तररात्रीपर्यंत अमावस्या असेल.
- या दिवशी रविवार असल्यामुळे या तिथीचे महत्त्व अधिक वाढते. सूर्योदय सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त संध्यकाळी 5 वाजून 49 मिनिटांनी होईल.
- पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी 10 वाजून 14 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू होईल.
- हर्षण योग रात्री 9.11 वाजेपर्यंत आणि करण चतुष्पाद दुपारी 12.45 वाजेपर्यंत राहील.
- राहु काळ संध्याकाळी 5 वाजेपासून ते संध्याकाळी 6.23 वाजेपर्यंत असेल. या काळात कोणतेही शुभ किंवा नवीन कार्य करू नये.
धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळून साधना, पूजा आणि ध्यान करणे विशेष फलदायी ठरते. या पवित्र तिथीला देवता आणि पितर पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा आहे. मौन व्रत ठेवून केलेले स्नान, दान आणि पूजा हे उपाय पितरांना अतिशय प्रसन्न करतात. त्यामुळे पितृदोष दूर होतो, पितरांची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख-शांती तसेच समृद्धी नांदते. पौष महिन्यातील ही अमावस्या प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात स्नानासाठी सर्वोत्तम मानली जाते, जिथे लाखो भाविक श्रद्धेची डुबकी घेतात. हा दिवस आत्मिक शुद्धी, पापमुक्ती आणि मोक्षप्राप्तीची संधी देणारा आहे.
मौनी अमावस्येला दान-पुण्य आणि पूजा-पठणास विशेष महत्त्व आहे. या दिवशी शक्य असल्यास नदी तीरावर स्नान करावे. घराजवळ नदी नसेल तर त्रिवेणी संगमाचे ध्यान करून घरी स्नान केल्यास नदीस्नानाचे फळ मिळते, अशी मान्यता आहे. मौन पाळून ध्यान करावे आणि ईश्वराची आराधना करावी. पितरांसाठी तर्पण- श्राद्ध करावे आणि काळे तीळ, कुश तसेच पाणी दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य अर्पण करावे. पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे आणि झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्याचाही विशेष विधी आहे. मौनी अमावस्येला मौन साधना, स्नान-दान आणि पितृपूजा केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
(नक्की वाचा: Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्वासह पिंपळाच्या झाडाची पूजा का करावी? जाणून घ्या कारण)
गुप्तदानाचे महत्त्व
धर्मशास्त्रानुसार या दिवशी केलेले दान-पुण्य अनेक पटींनी फलदायी ठरते. आपल्या क्षमतेनुसार काळे तीळ, गूळ, तूप, अन्नधान्य, तांदूळ, पीठ, उबदार कपडे, शिजवलेले अन्न, फळे किंवा धन दान करावे. गरीब, ब्राह्मण किंवा गरजू लोकांना भोजन देणंही पुण्यदायी मानले जाते. हे दान गुप्तपणे करणे उत्तम समजले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचीही पूजा करावी.
(Content Source IANS)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)