Mauni Amavasya 2026 Date And Shubh Muhurat: पौष महिन्यातील अनेक सणांपैकी मौनी अमावस्येचंही विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार या दिवशी गंगेचे पाणी अमृतासारखे पुण्यदायी होते. याच कारणामुळे मौनी अमावस्येला देशभरातून भाविक प्रयागराजच्या त्रिवेणी संगम तटावर स्नान करण्यास गर्दी करतात. मौनी अमावस्येचा दिवस मौन पाळून स्नान, ध्यान, दान आणि पितृपूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मौनी अमावस्येचा शुभ मुहूर्त, तिथी, धार्मिक महत्त्व आणि महाउपाय जाणून घेऊया...
मौनी अमावस्या 2026 तिथी | दर्श अमावस्या 2026 तिथी | Mauni Amavasya 2026 Tithi | Darsh Amavasya 2026 Tithi
मौनी अमावस्या तिथी प्रारंभ वेळ : 18 जानेवारी उत्तररात्री 12.04 (AM) वाजता, रविवारी
मौनी अमावस्या तिथी समाप्त वेळ : 19 जानेवारी उत्तररात्री 1.21 (AM) वाजता, सोमवारी
मौनी अमावस्येचे धार्मिक महत्त्व | Mauni Amavasya 2026 Importance | Amavasya January 2026 Timings
हिंदू मान्यतेनुसार मौनी अमावस्येला मौन पाळून केलेली साधना लवकर फलदायी ठरते. हा सण पितरांपासून देवतांपर्यंत सर्वांची कृपा प्राप्त करून देणारा मानला जातो. कुंभमेळ्याच्या काळात या दिवशी प्रयागराज संगमावर गंगेचे पवित्र जल अमृतासमान होते, अशी श्रद्धा आहे. त्या जलात स्नान केल्याने व्यक्तीचे तन आणि मन दोन्ही पापमुक्त तसेच पवित्र होते, असे मानतात. याच कारणामुळे कुंभमेळ्यात या दिवशी सर्वाधिक भाविक संगमावर स्नानासाठी येतात. मौनी अमावस्येला स्नान-ध्यानासोबतच पितरांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासही विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येला पितृपूजा केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो, अशी मान्यता आहे.
अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा का करावी?हिंदू धर्मात पिंपळाच्या वृक्षाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांसह शनी आणि पितरांचाही निवास असतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मौनी अमावस्येला पुण्यप्राप्ती आणि विविध दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्नान-ध्यानानंतर पिंपळाच्या झाडाला दूध मिसळलेले पाणी अर्पण करावे तसेच दीपदान करावे. पूजेच्या शेवटी पिंपळ देवतेची किमान 11 वेळा प्रदक्षिणा घालावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)