लहानपणाच्या आठवणी निघाल्या आणि त्यात Parle-G चं नाव आलं नाही असं होऊ शकत नाही. अनेकांची सकाळी चहाच्या कपात पार्ले जीची बिस्कीट बुडवून व्हायची. विशेष म्हणजे आजही पार्लेजीची क्रेझ कमी झालेली नाही. मात्र पार्ले-जीच्या पाकिटावर असलेल्या 'G' चा अर्थ काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हालाही याचा अर्थ जीनियस वाटत असेल तर तुम्ही जरा चुकताय. हो याचा फूल फॉर्म वेगळा आहे.
Parle-G ची सुरुवात कधी झाली?
पार्ले कंपनीची सुरुवात १९२९ मध्ये झाली. मात्र या कंपनीने १९३९ मध्ये बिस्किट बनवणं सुरू केलं. त्यावेळी या बिस्किटाचं नाव पार्ले जी नव्हे 'पार्ले ग्लुको' (Parle Gluco) होतं. हे बिस्कीट याचा गोडवा आणि एनर्जीसाठी ओळखलं जातं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारतीय आणि ब्रिटीश सैनिकांमध्ये याची मोठी मागणी होती.
नाव का बदललं?
स्वातंत्र्यानंतर बाजारात अनेक कंपन्यांनी ग्लुको नावाने बिस्कीट विकण्यास सुरुवात केली होती. खरं ग्लुको बिस्कीट कोणतं याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कंपनीने १९८० च्या दशकात पार्ले ग्लुकोचं नाव बदलून 'Parle-G' केलं.
'G' चा खरा अर्थ काय आहे?
कंपनीने जेव्हा या बिस्किटाचं नाव बदललं तेव्हा याचा खरा अर्थ 'Glucose' (ग्लुकोज) होता. कारण हे बिस्कीट शरीराला तातडीने एनर्जी देणाऱ्या ग्लुकोजनेयुक्त होतं. त्यासाठी याचं नावं अशा प्रकारे देण्यात आलं.
त्यानंतर २००० च्या जवळपास जेव्हा कंपनीने स्वत:चं प्रमोशन आमि जाहिरात सुरू केल्या तेव्हा त्यांनी एक टॅगलाइन दिली. 'G for Genius'. यानंतर अधिकांश लोकांच्या मनात ही टॅगलाइन घर करून गेली. आणि G चा अर्थ जीनियस आहे, असं वाटू लागलं. मात्र कंपनीच्या अधिकृत रेकॉर्डनुसार, सुरुवातीला G केवळ ग्लुकोजसाठी ठेवण्यात आले होते.
आजही पहिल्या क्रमांकावर...
महागाईदरम्यानही पार्ले-जीने स्वतःला सामान्य माणसाच्या आवाक्यात ठेवलं. आजही ग्रामीण ते शहरी प्रत्येक दुकानात ५ रुपयांचं पार्ले-जीचं पॅकेट उपलब्ध आहे. म्हणूनच त्याला 'भारताचं बिस्किट' म्हटले जाते.