Poisonous Snakes in Monsoon: पावसाळा सुरू झाला की निसर्गाला एक वेगळीच बहार येते, पण याच सुबत्तेसोबत एक अत्यंत भीतीदायक आणि जीवघेणं संकटही जमिनीच्यावर येत असतं. उन्हाळ्याच्या दिवसांत जमिनीच्या आत आणि बिळांमध्ये दडून बसलेले विषारी साप मुसळधार पाऊस सुरू होताच बाहेर पडू लागतात. पाणी भरल्यामुळे हतबल झालेले हे जीव आसऱ्यासाठी थेट मानवी वस्त्यांमध्ये, शेतात आणि घरांच्या कोपऱ्यात शिरकाव करतात.
भारतात आढळणाऱ्या शेकडो सापांपैकी 4 असे अत्यंत धोकादायक आणि विषारी साप आहेत, जे पावसाळ्यात सर्वाधिक बाहेर पडतात आणि यमराजाचे दूत ठरतात. या 4 सापांबद्दल आणि त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, याविषयी प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
भारतातील 'ते' 4 सर्वात धोकादायक साप
1. इंडियन कोबरा (नाग)
भारतात या सापाला नाग म्हणून ओळखले जाते आणि हा अत्यंत विषारी असतो. हा साप स्वतःचा बचाव करण्यासाठी मोठा फणा काढतो, हीच त्याची मुख्य ओळख आहे. पावसाळ्यात हा साप शेतात, नाल्यांच्या आसपास, झाडीत आणि काही वेळा थेट घरांमध्येही घुसतो. नागाचे विष थेट मानवी मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर हल्ला करते. यामुळे माणसाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो आणि वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढवतो.

Photo Credit: Canva
2. कॉमन क्रेट (मण्यार)
हा आशियातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक मानला जातो. मण्यार सापाचे शरीर काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे असते आणि त्यावर पांढऱ्या रंगाच्या पातळ पट्ट्या असतात. हा साप बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी बाहेर पडतो आणि घरांमध्ये, अंगणात किंवा कॉटच्या खाली सहज शिरू शकतो.
या सापाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि धोका म्हणजे, हा चावल्यानंतर अजिबात वेदना होत नाहीत, त्यामुळे बऱ्याचदा माणसाला साप चावल्याचे समजतच नाही. याच्या विषामुळे शरीराला लकवा म्हणजेच पॅरालिसिस होऊ शकतो.
( नक्की वाचा : Snakes in House: घरात साप लपून बसलाय हे कसं ओळखाल? हे 5 संकेत दिसताच तातडीने सावध व्हा )
3. रसेल वाइपर (घोणस)
घोणस हा साप आकाराने खूप जाड आणि वजनाने भारी असतो. याचे शरीर तपकिरी रंगाचे असून त्यावर नक्षी असते. समोर संकट दिसल्यावर हा साप प्रेशर कुकरसारखा अत्यंत मोठा आणि तीव्र फुत्कार सोडतो. घोणस अत्यंत आक्रमक आणि विषारी असतो. या सापाने दंश केल्यास माणसाच्या शरीराच्या आतून रक्तस्त्राव म्हणजेच इंटरनल ब्लीडिंग सुरू होते आणि किडनी पूर्णपणे निकामी होऊ शकते.

Photo Credit: Canva
4. सॉ-स्केल्ड वाइपर (फुरसे)
हा आकाराने खूप लहान असणारा पण अत्यंत चिडखोर स्वभावाचा साप आहे. याच्या अंगावर करवतीसारखे खवले असतात. जेव्हा याला धोका जाणवतो, तेव्हा हा स्वतःचे शरीर एकमेकांवर घासून करवतीसारखा आवाज काढतो. हा साप कोरड्या जागी किंवा शेतामध्ये जास्त पाहायला मिळतो. फुरसे चावल्यास रक्ताच्या गाठी तयार होतात आणि किडनी निकामी होऊन माणसाचा जीव जाऊ शकतो.
90 टक्के मृत्यूंमागे हेच 4 साप जबाबदार
एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे की, भारतात साप चावल्याच्या जेवढ्या घटना घडतात, त्यापैकी तब्बल 90% प्रकरणांमध्ये वर उल्लेख केलेले 4 सापच कारणीभूत असतात. या सापांना भारतात 'बिग फोर' म्हटले जाते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, या 4 सापांच्या विषावर उपलब्ध असलेले अँटी-स्नेक व्हेनम (ASV) म्हणजेच विषरोधक लस ही 80% प्रकरणांमध्ये अत्यंत प्रभावी ठरते.

साप चावल्याने देशात दरवर्षी 50 हजार मृत्यू
भारतात दरवर्षी साप चावण्याच्या जवळपास 30 ते 40 लाख घटनांची नोंद होते. यापैकी दुर्दैवाने तब्बल 50 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो. ही संख्या जगभरात साप चावल्याने होणाऱ्या एकूण मृत्यूंच्या अर्धी आहे, म्हणजेच जगात साप चावल्याने जेवढे लोक मरतात, त्यातील निम्मे लोक एकट्या भारतात दगावतात.
विषारी साप चावल्यानंतर शरीरात विष वेगाने पसरू लागते. अशा वेळी तांत्रिक-मांत्रिकाच्या नादी न लागता पीडित व्यक्तीला जितक्या लवकर शक्य होईल तितके लवकर सरकारी रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक आहे. वेळेत योग्य उपचार आणि अँटी-व्हेनम इंजेक्शन मिळाल्यास रुग्णाचा जीव आणि संभाव्य लकवा सहज टाळता येऊ शकतो. त्यामुळे या पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा आणि सावध राहा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world