Ayurvedic Remedies For Monsoon: पावसाळा सुरू झाला की वातावरणात सुखद गारवा येतो, पण त्याचसोबत सर्दी-खोकला यासारख्या अनेक आजारांचाही धोका वाढतो. या ऋतूत हवेतील ओलसरपणा आणि संसर्ग वाढल्यामुळे शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. म्हणूनच पावसाळ्याचा आनंद घेताना आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि छोट्या-छोट्या त्रासांपासून दूर राहण्यासाठी डॉ. मानसी धामणकर (Dr Manasi Mehendale Dhamnakar) यांनी सांगितलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या घरगुती आणि आयुर्वेदिक टिप्स जाणून घेऊया...
1. खानपानाबाबत घ्यायची काळजी:
पावसाळा आणि गरमागरम कांदा भजी-चहा हे समीकरण ठरलेलं असतं. पण हा आनंद घेताना शरीराचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
2. आल्याचा चहा आणि ओव्याच्या पानांची भजी:
पावसाळ्यात आल्याचा चहा शरीराला ऊब देतो. नेहमीच्या कांदाभजीसह या ऋतूत ओव्याच्या पानांची भजी नक्की ट्राय करा. ओव्याची पाने पचनासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
3. तळलेलं खाल्ल्यानंतर 'हा' उपाय करा:
जर तुम्ही भजी किंवा इतर तळलेले पदार्थ खाल्ले असतील तर त्यानंतर आवर्जून हळद आणि गरम पाणी प्यावे. यामुळे घसा खराब होत नाही आणि इन्फेक्शनचा धोका टळतो.
4. रात्रीचे हलके जेवण:
पावसाळ्यात रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते. त्यामुळे रात्री जड अन्न खाण्याऐवजी मूगाची खिचडी आणि गरम सूप घेण्यास प्राधान्य द्यावे.
5. पाचकाग्नी आणि पाण्याचे नियम:
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शरीरातील 'पाचकाग्नी' (पचनशक्ती) मंद होते. ती उत्तम ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा
तप्तशील जल:
पाचकाग्नी मंद होऊ नये म्हणून तप्तशील जल प्यावे. या पाण्यामध्ये चिमूटभर सुंठ मिक्स करून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
थंड पदार्थांना नकार:
या ऋतूत थंड पेये, आइस्क्रीम किंवा फ्रीजमधील थंड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
(नक्की वाचा: दिलजीत दोसांझ 10 वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त; सर्जरी का टाळली? बड्या डॉक्टरांनी दिला थेट धोक्याचा इशारा)
6. घरातील वातावरणासाठी वेखंड-कापूर धूप:
संध्याकाळच्या वेळी घरामध्ये वेखंड आणि कापूर एकत्र करून त्याचा धूप करावा. यामुळे घरात चांगला सुगंध तर येतोच शिवाय पावसाळ्यात वाढणारे डास पळून लावण्यास आणि सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करण्यास मदत होते.
7. अंगदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका:
पावसाळ्यातील हवेमुळे अनेकांचे अंग आखडते किंवा सांधे दुखू लागतात. यासाठी सोपे उपाय:
व्यायाम आणि कोमट तेल:
अंग आखडू नये म्हणून रोज आंघोळीपूर्वी हलका व्यायाम करा. आंघोळीच्या आधी सांध्यांच्या ठिकाणी कोमट तेल लावून हलकासा मसाज करावा आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा.
(नक्की वाचा: Frequent Urination At Night: रात्री वारंवार लघवीला जावं लागतंय? असू शकतो 'हा' गंभीर धोका)
झोपताना घ्यायची काळजी:
रात्री झोपताना पाठीखाली रग (जाड चादर किंवा ब्लँकेट) घ्या. यामुळे कंबरदुखीचा त्रास होत नाही आणि अंग आंबणे (आखडणे) जाणवणार नाही.
8. पावसाळी रानभाज्यांची चव नक्की घ्या:
पावसाळ्यात बाजारात येणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी अमृत मानल्या जातात. या ऋतूत खालील भाज्यांचा आहारात समावेश नक्की करा:
- टाकळा: ही भाजी पाचक असून पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते.
- भारंगी: मधुमेहाच्या (डायबिटीज) रुग्णांसाठी भारंगीची भाजी गुणकारी ठरते.
- कर्टुल: कर्टुलच्या काचऱ्या किंवा भाजी करून त्याची चव आवर्जून घ्यावी, ही भाजी अत्यंत पौष्टिक असते.
डॉ. मानसी धामणकर यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)