Monsoon Home Care: पावसाळ्याच्या दिवसांत घराच्या भिंतींना ओल येणे आणि त्यातून कुबट, दुर्गंधीयुक्त वास येणे ही एक अत्यंत सर्वसामान्य समस्या बनली आहे. हा वास घालवण्यासाठी अनेक जण महागडे एअर फ्रेशनर किंवा केमिकल्स असलेले प्रोडक्ट्स खरेदी करतात. मात्र, खिशातला एकही रुपया खर्च न करता, घरात उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमचे घर कोरडे आणि सुवासिक ठेवू शकता. तुमच्याही घरात भिंतींच्या ओलीमुळे येणाऱ्या वासाने तुम्ही त्रस्त असाल, तर हे 4 सोपे घरगुती उपाय तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकतात.
उन्हाचा आणि ताज्या हवेचा पुरेपूर वापर करा
हवामानातील बदलांनुसार जेव्हा कधी पाऊस थांबेल आणि ऊन पडेल, तेव्हा घरातील खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे उघडून द्या. ताज्या हवेची ये-जा आणि सूर्यप्रकाश खोलीतील ओलसरपणा कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी ठरतात. यामुळे भिंतींमधील ओलावा लवकर सुकतो आणि कुबट वास हळूहळू पूर्णपणे नाहीसा होतो.
( नक्की वाचा : Poisonous Snakes: पावसाळा सुरू होताच जमिनीखालून बाहेर पडतात 'हे' 4 यमदूतासारखे साप, वाचा कसा करणार स्वत:चा बचाव )
बेकिंग सोडा आणि मीठ
घरातील ओलावा कमी करण्यासाठी एक छोटा आणि सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा आणि मीठ होय. एका लहान वाटीमध्ये बेकिंग सोडा आणि सुके मीठ एकत्र भरून ते खोलीच्या कोपऱ्यात किंवा ज्या भिंतीला जास्त ओल आली आहे त्या जागेजवळ ठेवून द्या. या दोन्ही गोष्टी हवेत असलेला अतिरिक्त ओलावा आणि दुर्गंधी स्वतःकडे शोषून घेतात, ज्यामुळे खोलीतील वातावरण ताजेतवाने राहण्यास मदत होते.
कापूर आणि लवंग देणार नैसर्गिक सुवास
घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर खोलीत पसरू देणे किंवा कापूर आणि लवंग एका सुती कपड्यात एकत्र बांधून ओलीच्या जागेजवळ ठेवणे अत्यंत फायदेशीर ठरते. कापूर आणि लवंगाचा तीव्र पण सुखद सुगंध भिंतींवर येणाऱ्या बुरशीचा वास दाबून टाकतो आणि खोलीत एक नैसर्गिक ताजगी निर्माण करतो.
हा सोपा घरगुती वापरून पाहा
घरातील कुबट वास कायमचा घालवण्यासाठी तुम्ही एक विशेष मिश्रण तयार करू शकता. यासाठी 2 चमचे मीठ, 2 चमचे बेकिंग सोडा, 2 कापूर, 2 लवंगा आणि थोडेसे शॅम्पू एकत्र करून एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण एका वाटीत किंवा कापडात बांधून ओलावा असलेल्या भिंतीजवळ ठेवा. यामुळे दुर्गंधी तर दूर होईलच, शिवाय ओलाव्यामुळे निर्माण होणाऱ्या बुरशीचा (फंगस) त्रासही कमी होईल. अर्थात, भिंतींमधील ओल सतत वाढतच असेल, तर पाणी कशामुळे लीक होतोय याची मुख्य तपासणी करून घेणेही तितकेच गरजेचे आहे.