ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार आता समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार नेहमी सामन्य व्यक्तींपेक्षा पुढे राहण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरुन त्यांना फसवणे सोपे होईल. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करून तुम्ही फसवणूक टाळू शकता, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 'झिरो-क्लिक मालवेअर' वापरण्यास सुरुवात केली आहे. झिरो क्लिक अटॅक म्हणजे काय समजून घेऊयात.
झिरो-क्लिक मालवेअर म्हणजे काय?
झिरो-क्लिक मालवेअर आता ऑनलाइन फसवणुकीत वापरले जात आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, क्लिक न करता कोणीही फसवणुकीचा बळी होऊ शकतो. याचा अर्थ असा की वापरकर्त्याने अज्ञात लिंकवर कोणतीही कारवाई केली नाही तरीही फसवणूक किंवा सायबर हॅक होऊ शकतो. यामध्ये पीडित व्यक्तींना हे देखील कळत नाही की त्याच्यासोबत काहीतरी चुकीचे घडत आहे. हे पूर्णपणे रिमोट अटॅक आहेत ज्यात यूजरने अॅक्शन आहे की नाही याचा काहीही फरक पडत नाही.
जेव्हा कोणताही अनोळखी व्यक्ती तुमच्या डिव्हाइसवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुमच्या डिव्हाइसमध्ये एक स्पाय सॉफ्टवेअर अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी, फसवणूक करणारे मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवर एक लिंक पाठवतात आणि त्यावर क्लिक केल्यावर, डिव्हाइसमध्ये स्पाय सॉफ्टवेअर अॅक्टिव्ह होते. पण झिरो-क्लिकच्या बाबतीत असे नाही.
झिरो-क्लिक मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची देखील आवश्यकता नाही. त्यामुळे ते अधिक धोकादायक मानले जाते. येथे कोणत्याही प्रकारची अॅक्टिव्हिटी होत नसल्याने, त्याचे संकेत शोधणे खूप कठीण आहे. त्यांचा माग काढणे हे अत्यंत कठीण काम आहे.
झिरो-क्लिक अटॅक अनेक वर्षांपासून होत आहेत. स्मार्टफोन्स आल्यानंतर त्यांचे काम सोपे झाले आहे. कारण स्मार्टफोन्समध्ये आता बराच पर्सनल डेटा साठवला जातो. आता व्यक्ती आणि संस्था देखील मोबाईलवर अवलंबून राहू लागल्या आहेत. म्हणून, झिरो-क्लिक अटॅकबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
जाहिरात
झिरो-क्लिक मालवेअर कसे काम करते?
झिरो-क्लिक हॅकर्स सिस्टममध्ये घुसण्यासाठी डेटा व्हेरिफिकेशनच्या त्रुटींचा फायदा घेतात. सायबर अटॅक रोखण्यासाठी सिस्टममधील बहुतेक सॉफ्टवेअर डेटा व्हेरिफिकेशनचा वापर करतात. त्यांच्यातील छोटासा लूपहोल देखील सायबर गुन्हेगारांना हल्ला करण्याची संधी देते. बऱ्याचदा, झिरो-क्लिक अटॅक मेसेजिंग किंवा व्हॉइस कॉलिंग ऑफर करणाऱ्या अॅप्सना लक्ष्य करतात. कारण या सर्व्हिस सोर्सकडून डेटा प्राप्त करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. हल्लेखोर डिव्हाइसला धोका निर्माण करणारा कोड इंजेक्ट करण्यासाठी विशेषतः तयार केलेला डेटा वापरतात. यामध्ये लपवलेले टेक्स्ट मेसेज किंवा इमेज फाईल असू शकतात.