सेफ्टी पिन, महिलांच्या ॲक्सेसरी बॅगचा भाग आहे. ही छोटीशी पिन बाजारात केवळ 10 किंवा 20 रुपयांना सहज उपलब्ध होते. अनेक जुन्या भारतीय महिलांच्या बांगड्यांना ही पिन अडकवलेली दिसते. कारण गरज असताना ती सहज वापरता येते. मात्र आता या साध्या सेफ्टी पिनने सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
जगातील नामांकित फॅशन ब्रँड प्राडा (Prada) ने एक सिंगल सेफ्टी पिन ब्रोच विक्रीसाठी बाजारात आणला आहे. ज्याची किंमत ऐकून सामान्य ग्राहकांना धक्का बसला आहे. या साध्या सेफ्टी पिन ब्रोचची किंमत तब्बल 775 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 68,758 रुपये एवढी आहे.
'सेफ्टी पिन ब्रोच'मध्ये आहे तरी काय?
प्राडाने विक्रीला ठेवलेला हा ब्रोच सोन्याचा सेफ्टी पिन असून, त्याला विणलेल्या धाग्याचा एक छोटासा आकर्षक चार्म जोडलेला आहे. अनेक महागड्या ब्रोचमध्ये हिरे किंवा दुर्मिळ रत्ने जडवलेली असतात. ज्यामुळे त्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये असू शकते. मात्र, प्राडाचा हा ब्रोच केवळ रंगीबेरंगी धाग्याने गुंडाळलेला आहे. साध्या आणि रोजच्या वापरातील वस्तूला इतकी किंमत लावल्यामुळे ग्राहकही चकीत झाले आहेत.
सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रिया
प्राडाच्या या अत्यंत महागड्या ॲक्सेसरीवर 'ब्लॅक स्वान साझी' (Black Swan Sazy) नावाच्या एका फॅशन इन्फ्लुएन्सरने इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट करून यावर उपहास केला. तिने व्हिडिओमध्ये म्हटले की, "मी पुन्हा एकदा श्रीमंत लोकांना विचारते की, तुम्ही तुमच्या पैशांचे काय करत आहात? कारण जर तुम्हाला काहीच सुचत नसेल, तर आम्ही तुम्हाला खात्री देतो की, उर्वरित लोक तुम्हाला चांगल्या कल्पना देऊ शकतात."