Ruddy-breasted crake : शहरीकरण, शेती आणि औद्योगिक विकास यांसारख्या मानवी क्रियाकलापांमुळे प्राणी-पक्ष्यांसह अनैक जैविक घटकांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात येत आहेत. या अधिवासांचं रूपांतर मानवाच्या वापरासाठी होत असताना पर्यावरणावर अवलंबून असलेल्या स्थानिक प्रजातींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांची संख्या कमी होते आणि नामशेष होण्याची शक्यता वाढते.
उदाहरणार्थ, गवताळ प्रदेश किंवा पाणवठ्याचे शेतीत रूपांतर केल्याने केवळ वन्यजीवांसाठी उपलब्ध क्षेत्र कमी होत नाही तर एकूणच परिसंस्थांचे तुकडे होतात. प्रजाती विखुरतात आणि त्यांची पुनरुत्पादनाची क्षमता विस्कळीत होते. अशा स्थितीचे पडसाद दूरगामी आहेत. अभ्यासातून अशा अधिवासांचा नाश झाल्याने आययूसीएन मूल्यांकनातील रेड लिस्टमधील 85% प्रजाती धोक्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणून जैवविविधतेचे जतन करण्यासाठी (Conservation of biodiversity) आणि समृद्ध परिसंस्था राखण्यासाठी अधिवास जपणं अत्यावशक आहे.
Photo Credit: Rahul S Vanjari
कोंबडीसारखी दिसणारी फटाकडी...
मध्य भारतातील दख्खनच्या पठारावरील एक उदाहरण विस्मयकारक आहे. शहरातील तलावांना संरक्षित करण्याच्या हेतूने त्याभोवती असणारी झुडुपं साफ करून दगड आणि सिमेंटचं बांधकाम करून घेण्यात आलं. जेणेकरून स्थानिक रहिवाशांना तलाव परिसराचा अधिक आनंद घेता यावा. हा उद्देश छान आहे पण याला आणखी एक बाजू आहे. जी जागा साफ करून बांधकाम केलंय तेथे पूर्वी बोर, करंज, बाभुळ यासारखी स्थानिक झाडी, बेशर्मी आणि हत्ती गवतासारखी उभयचर वनस्पती होत्या. यामुळे तळ्याकाठी पक्ष्यांसाठी अरुंद व गार छायेचा आश्रय होता. यामध्ये वटवट्या, धोबी, पाणकोंबडी, नाम्या वर्षभर राहायचे तसेच हिवाळी पाहुणे अडई, चक्रवाक, भुवई बदक तीन चार महीने थांबून जायचे. यांच्या सोबत आणखी एक पक्षी कुटुंब असायच ते म्हणजे (Zapornia fusca) फटाकडी पक्ष्याचं.
अनेक आधुनिक बदलामुळे खाद्य, संरक्षण आणि प्रजननासाठी जलअधिवासांवर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींना मोठा धोका निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ, दूषित पाण्याच्या स्त्रोतांमुळे माशांच्या संख्येत घट होऊ शकते, ज्यावर अनेक पक्षी अन्नासाठी अवलंबून असतात. तर तलावांभोवती झाडामद्धे घरटे बांधण्याची ठिकाणे आणि अन्नाची उपलब्धता रूढावते. शेवटी शहरी तलावांमध्ये बदल करण्यामागील हेतू संवर्धन-केंद्रित असला तरी, पर्यावरणीय असंतुलन, पक्षी जैवविविधता आणि या परिसंस्थांच्या एकूण आरोग्याला धोका निर्माण करते.
Photo Credit: Rahul S Vanjari
लाल छातीच्या फटाकडीचा जीवन संघर्ष..
भारतात फटाकडी (Ruddy Crake Bird) पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत परंतु इथे आपण रडी-ब्रेस्टेड क्रेक (Rudi-breasted crack) म्हणजेच लाल छातीच्या फटाकडीचा जीवन संघर्ष पाहूया. ही रॅलिडी पक्षी कुटुंबातील एक प्रजाती असून दक्षिण आशियातील पाणथळ आणि दलदलीच्या जागांमध्ये राहते. याचा विस्तार भारतीय उपखंडापासून आग्नेय आशिया, चीन आणि जपानपर्यंत पसरलेला आहे. मध्यम आकाराची सुमारे 22 सेमी लांब असून निमुळत्या शरीर रचनेमुळे दाट झुडुपामधून तुरुतुरु चालते. पिसारा फिकट तपकिरी असतो पोटाखालच्या भागात पांढरे पट्टे असतात. चोच पिवळसर, डोळे आणि पाय ठळक लाल असतात. हा फटाकडी गांडूळ, कीटक आणि मोठे गोगलगाय यावर आपलं गुजराण करतो. पाण वनस्पतीच्या दाटणीत जमिनीवर घरटे बांधतो, त्यामध्ये 6 ते 9 अंडी घालतो. आहार शोधण्यासाठी आणि पिल्लांना वाढविण्यासाठी कमी पाणी, चिखल आणि दाट झुडुपी जागा ह्या फटाकडीच्या मुख्य ठिकाणं आहेत. फटाकडीला स्वतःचा आवाज आहे.
धोका निर्माण झाल्यास किंवा तिच्या परिवारातल्या सदस्यांना निरोप देण्यासाठी किंवा विणीच्या हंगामात आकर्षिक करण्यासाठी करूरू क्रक्रू क्रक्रू क्रक्रू अशा आवाजाचा उपयोग होतो. पण सर्वसामान्य वेळी पक्ष्याची उपस्थिती समजायची असेल तर त्याचा आवाज ऐकायला मिळणं फार कठीण आहे. माणसाची, शिकारी पक्ष्याची किंवा आकाराने मोठ्या असणाऱ्या पक्ष्याची चाहूल लागली की, कोणताही आवाज न करता झाडीत पळून जाते. ती पळताना नाही पंखांचा आवाज होत, ना गवताची पान हालत आणि पाण्याचा आवाजही होत नाही. क्षणार्धात तो पक्षी झुडुपात नाहीसा होतो. म्हणूनच या पक्ष्याचा शास्त्रीय अभ्यास करणे तुलनेने एक आव्हानच ठरते आणि यांच्या जीवनाचे कुतूहल वाढत जाते.
Photo Credit: Rahul S Vanjari
शहरात नूतनीकरण झालेल्या तलावातून फटाकडी नाहीशी झाली. ती नेमकी गेली कुठे असावी? याचा शोध घेताना समजले की. शहराबाहेरच्या सांडपाण्याच्या ओढ्याजवळ या पक्ष्याला हवा असलेला अधिवास निर्माण झाला. दूषित पाणी असल्याने माणसाची वहिवाट कमी. ओढा आणि नाल्याची मदत घेत हे पक्षी याठिकाणी पोहोचले. लाजरा स्वभाव आणि मितभाषीपणाचा फायदाही झाला. पाणकणीस अगदी जोमाने वाढल्याने गवताची घनदाट भिंत तयार झाली होती. सतत पाणी थांबल्याने पाण्यात किटकांच्या अळ्या, गांडूळ आणि गोगलगाय वाढू लागले. प्रजननासाठी उत्तम अधिवास निर्माण झाला. हीच संधी साधून लाल छातीच्या फटाकडीने घरटे बांधले आणि दोन अंडी दिली व ती जन्मला आली. त्यासोबत रॅलीडी कुटुंबातील इतर प्रजाती सुद्धा तेथे स्थिरावल्या. लाजरा स्वभाव, कमी आवाज आणि नव्या जागांचा शोध घेऊन मानवाने दुर्लक्षित केलेल्या ठिकाणी स्वत:चे अस्तित्त्व स्थापन करण्यात फटाकडी यशस्वी झाली आणि तिची पिलावळ नवीन जागेत वाढू लागली.
(लेखक - राघवेंद्र श्रीकृष्ण वंजारी (पक्षी निरीक्षक), राहुल श्रीकृष्ण वंजारी (पक्षी अभ्यासक))