शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli News: सांगली जिल्ह्यातील मिरजेत साजरी होणारी गोसावी समाजाची होळी ही संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या वेगळ्या परंपरेसाठी ओळखली जाते. एरवी कौटुंबिक जीवनात पुरुष प्रधान संस्कृतीचे चित्र पाहायला मिळत असले, तरी या होळीच्या निमित्ताने महिलांना आपल्या पतीराजना आणि समाजातील पुरुषांना काठीने बदडण्याची एक अनोखी संधी मिळते.
अनेक वर्षांपासून जपलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते, जिथे महिलांच्या हातात काठ्या आणि पुरुषांच्या पाठीवर त्याचे फटके असे काहीसे मजेशीर दृश्य पाहायला मिळते.
काय आहे परंपरा?
गोसावी समाजात होळीच्या सणानंतर तिसऱ्या दिवशी या विशेष खेळाचे आयोजन केले जाते. याला स्थानिक भाषेत झेंड्याचा खेळ असे म्हटले जाते. या खेळाचे स्वरूप अतिशय रंजक असते. गल्लीच्या मध्यभागी एक झेंडा बांधला जातो आणि तो झेंडा पळवण्याचे आव्हान पुरुष मंडळींना दिले जाते. मात्र, हे काम वाटते तितके सोपे नसते.
गल्लीत पुरुषांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी महिला हातात काठ्या घेऊन सज्ज असतात. पुरुष झेंडा हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा महिला त्यांना काठ्यांनी मारून पिटाळून लावतात. हा खेळ सकाळी सुरू होऊन दुपारपर्यंत चालतो, ज्यामध्ये संपूर्ण समाज एकत्र येतो.
( नक्की वाचा : Pune News: लेकीसाठी बाप झाला 'सिंघम'! हुल्लडबाजाला पुण्यातील भर कॉलेजमध्येच चोपले, पाहा VIDEO )
धार्मिक श्रद्धेसोबतच मनोरंजनाचा ठेवा
महाराष्ट्रभरातील गोसावी समाज हा धार्मिक वृत्तीचा मानला जातो. त्यामुळे हिंदू संस्कृतीतील सण ते मोठ्या श्रद्धेने साजरे करतात. या परंपरेमुळे महिलांना वर्षातून एकदा पुरुषांवर आपला अधिकार गाजवण्याची आणि गमतीने का होईना पण त्यांना धडा शिकवण्याची संधी मिळते.
मार खाताना पुरुषही मागे हटत नाहीत, उलट ते या परंपरेचा आनंद घेतात. खेळ संपल्यानंतर सर्व महिला आणि पुरुष एकत्र येऊन होळीची गाणी गातात आणि वाद्यांच्या तालावर ठेका धरतात. हा अनोखा थरार पाहण्यासाठी मिरजेत बघ्यांची मोठी गर्दी दरवर्षी जमते.
दुष्काळाचे भान आणि सामाजिक संदेश
दरवर्षी या खेळादरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करून धुळवड साजरी केली जाते. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असून दुष्काळाचे सावट आहे. हे भान राखून मिरजेतील गोसावी समाजाने एक कौतुकास्पद निर्णय घेतला. यावर्षी पाण्याचा अपव्यय टाळून त्यांनी केवळ गुलाल आणि रंगांच्या मदतीने कोरडी धुळवड साजरी केली. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, असा मोलाचा संदेश या परंपरेच्या माध्यमातून समाजाने दिला आहे.