Savitribai Phule Jayanti 2026: पुणे शहरातील अरुंद गल्लीबोळांत वर्ष 1848 रोजी एकेदिवशी सकाळी एक महिला आपल्या घरातून बाहेर पडली. तिच्या हातात काही पुस्तकं होती आणि डोळ्यांत विलक्षण आत्मविश्वास होता. ती जशी रस्त्याने पुढे चालू लागली, तशी गल्लीच्या कोपऱ्यावर उभे असलेले काही लोक कुजबुज करू लागले. अचानक एक दगड तिच्या खांद्यावर येऊन आदळला. यानंतर तिच्या चेहऱ्यावर चिखल फेकण्यात आला आणि अपशब्द सुनावण्यात आले. तरीही ती महिला थांबली नाही. तिला माहिती होते की आजही शाळेत पोहोचल्यावर तिला आपली मळलेली साडी बदलावी लागणार आहे. ती महिला दुसरीतिसरी कोणीच नसून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) होत्या.
वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह झाला, अन्...
3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात जन्मलेल्या सावित्रीबाईंचे बालपण अशा काळात गेले, ज्या काळात मुलींनी अक्षर पाहणेही पाप मानले जात होते. अवघ्या नऊ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह 13 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी करून देण्यात आला. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंच्या आतील ती आग ओळखली होती, जी समाज विझवू पाहत होता. त्यांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण देण्यास सुरुवात केली. ज्योतिराव स्वतः एक महान शिक्षक, विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारी होते.
Photo Credit: NDTV Marathi
ज्योतिराव फुलेंनी दिलं सावित्रीबाईंना शिक्षण
सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. ज्योतिराव शिक्षणाच्या माध्यमातून समाजात जागृती घडवून आणू इच्छित होते आणि ते स्त्रीशिक्षणाचे कट्टर समर्थक होते. पण समाजाच्या तीव्र विरोधामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. ही अडचण त्यांनी आपली मावशी सगुणाबाई आणि पत्नी सावित्रीबाईंसमोर मांडली. यावर सगुणाबाईंनी म्हटलं की, शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण देण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. एखादा समाज बदलायचा असेल तर त्या समाजातील महिलांना शिक्षित होणे अतिशय आवश्यक आहे आणि तेव्हा या दोन्ही स्त्रिया तत्काळ स्त्रीशिक्षणाच्या ध्येयाच्या पहिल्या विद्यार्थिनी बनल्या. दुसऱ्याच दिवशी गावातील आमराईच्या सावलीत अस्पृश्य महिलांसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातील दलित स्त्रीशिक्षणाचा हा पहिला आणि ऐतिहासिक प्रयत्न होता.
पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यामध्ये सावित्रीबाईंनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली, तेव्हा या शाळेत केवळ सहा विद्यार्थिनी होत्या. पण त्या काळातील कट्टर समाजासाठी हा मोठा धक्का होता. शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर बौद्धिक मुक्ती आहे; असे सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांचे मत होते.
Photo Credit: PTI
त्यांना माहिती होते की जर एखादी दलित किंवा मागासवर्गीय महिला शिक्षित झाली तर ती शतकानुशतके चालत आलेल्या गुलामगिरीच्या बेड्या झुगारेल. त्यांच्या शाळेत गणित आणि विज्ञानाबरोबरच तर्कशक्तीवर विशेष भर दिला जात असे.
शिक्षण घ्या आणि स्वावलंबी व्हा: सावित्रीबाई फुलेसावित्रीबाई या एक क्रांतिकारी कवयित्रीही होत्या. त्यांच्या ‘काव्य फुले' या काव्यसंग्रहात त्या लिहिलंय की, "जा, शिक्षण घ्या, स्वावलंबी व्हा". त्यांनी इंग्रजी शिक्षणाला 'इंग्रजी माता' असे संबोधलंय. त्यांचा युक्तिवाद होता की इंग्रजी भाषा ही एक अशी खिडकी आहे, ज्याद्वारे जगभरातील आधुनिक विचार भारतात येऊ शकतात. बहुजन समाजाने जागतिक ज्ञानाशी जोडले जावे, अशी त्यांची इच्छा होती.
सावित्रीबाईंचा संघर्ष केवळ शाळेच्या वर्गापुरता मर्यादित नव्हता. त्या काळात होणारे विधवा महिलांचे शोषण आणि समाज त्यांच्या मुलांना स्वीकारण्यास तयार नसल्याच्या गोष्टी त्या पाहत होत्या. यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. "गर्भवती विधवांनो, येथे या आणि सन्मानाने आपल्या बाळाला जन्म द्या", असे पोस्टर्स त्यांनी भिंतींवर लावले होते.
(नक्की वाचा: Savitribai Phule Jayanti Speech: सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळेत करण्यासाठी ही घ्या 5 दमदार भाषणं, मिळेल कौतुकाची थाप)
66व्या वर्षीही संघर्ष सुरूच होता...1897 साली पुणे शहरात प्लेगची साथ पसरली तेव्हा सवर्ण डॉक्टर दलित वस्त्यांमध्ये जाण्यास घाबरत होते. वयाच्या 66व्या वर्षीही सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. एके दिवशी त्यांना कळले की मुंढवा येथील एका वस्तीमध्ये पांडुरंग नावाचा 10 वर्षांचा मुलगा गंभीर आजारी आहे. सावित्रीबाई स्वतः तेथे पोहोचल्या, आजारी मुलाला त्यांनी उचलले आणि रुग्णालय गाठलं. मुलाचा जीव वाचला, पण या सेवेदरम्यान सावित्रीबाईंना आजाराचा संसर्ग झाला. 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(नक्की वाचा: Savitribai Phule Jayanti 2026 Speech: सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त असे करा दमदार भाषण, होईल टाळ्यांचा कडकडाट)
2 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय जन सहयोग आणि बाल विकास संस्थान (NIPCCD) याचे अधिकृतपणे नाव बदलून 'सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्थान' असे करण्यात आले. 4 जुलै रोजी झारखंडची राजधानी रांची येथे या संस्थेच्या नव्या केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरआधारित सिनेमा
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हिंदी सिनेमामध्ये अभिनेत्री पत्रलेखाने सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारलीय. 27 मार्च रोजी अभिनेत्रीने IANS वृत्तसंस्थेशी बातचित करताना सांगितलं होते की, ही भूमिका मिळाली तेव्हा मी खूप उत्साही आणि चिंतेतही होती. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी या भूमिकेकडे लगेचच आकर्षित झाले. कारण ही केवळ एका ऐतिहासिक व्यक्तीची भूमिका नव्हती तर धाडसाची कहाणी होती. जेव्हा याबाबत अनंत सर आणि माझी पहिली चर्चा झाली, तेव्हा इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारताना मला चिंता वाटत होती, पण त्यांनी मला खूप मदत केली.
(Content Source IANS)