Importance of Temple Bell: हिंदू धर्मात देवाची भक्ती करताना अनेक परंपरांचे पालन केले जाते, त्यापैकी एक म्हणजे मंदिरातील किंवा देवघरातील घंटी. मंदिरात पाऊल ठेवताच सर्वात आधी आपण तिथे असलेली मोठी घंटी वाजवतो. अनेकदा आपण हे सवयीने करतो, पण त्यामागे केवळ धार्मिकच नाही तर मोठे शास्त्रीय कारणही दडलेले आहे. स्कंद पुराण, अग्नी पुराण आणि तंत्र ग्रंथांमध्ये घंटीच्या महत्त्वाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. घंटीच्या नादामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन मनाला शांती मिळते, असे मानले जाते.
पाप ग्रहांचा प्रभाव कमी करण्यास उपयुक्त
ज्योतिषशास्त्रानुसार, घंटी वाजवल्यामुळे केतु या पाप ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू कमजोर असतो, त्यांना तज्ज्ञांकडून नियमितपणे घंटी वाजवण्याचा सल्ला दिला जातो. घंटी आणि त्यातून निघणारा नाद हा ब्रह्माचे रूप मानला जातो. यामुळे वातावरणाची शुद्धी होते आणि आपल्या शरीरात नवीन शक्ती आणि ऊर्जेचा संचार होतो.
एकाग्रता वाढवण्यासाठी घंटीचे महत्त्व
घंटीचा आवाज केवळ कानांना मधुर वाटत नाही, तर तो आपल्या मेंदूला शांत करण्याचे काम करतो. जेव्हा आपण घंटी वाजवतो, तेव्हा आपला मेंदू आपोआप फोकस मोडमध्ये येतो. यामुळे ध्यान (मेडिटेशन) करणे सोपे जाते. पूजेच्या वेळी घंटी वाजवण्यामागचा मूळ उद्देश हाच आहे की, भक्ताचे मन इकडे तिकडे न भरकटता पूर्णपणे देवाच्या चरणी आणि प्रार्थनेत एकाग्र व्हावे.
( नक्की वाचा : Snakes in House: घरात साप लपून बसलाय हे कसं ओळखाल? हे 5 संकेत दिसताच तातडीने सावध व्हा )
शरीरातील चक्रांना जागृत करणारे यंत्र
घंटीला चेतना जागृत करणारे यंत्रही म्हटले जाते. असे मानले जाते की, घंटीच्या आवाजामुळे निर्माण होणाऱ्या लहरी आपल्या शरीरातील 7 चक्रांना जागृत करतात. यामुळे शरीराचे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते. ही बाब केवळ धार्मिक मान्यतेवर आधारित नाही, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही या ध्वनी लहरींचा सकारात्मक परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचे मानले जाते.
घंटीचे मुख्य 4 प्रकार
शास्त्रात घंटीचे प्रामुख्याने 4 प्रकार सांगितले आहेत:
गरुड घंटी: ही आकाराने लहान असते आणि आपण घरामध्ये पूजेसाठी तिचा वापर करतो.
द्वार घंटी: ही मंदिरांच्या मुख्य दरवाजावर लावलेली असते. ही लहान किंवा मोठी अशा दोन्ही आकारात असू शकते.
हात घंटी: ही पितळेच्या एका गोल प्लेटसारखी असते, जिला लाकडी दांड्याने वाजवले जाते.
घंटा: हा आकाराने खूप मोठा असतो. याचा नाद इतका तीव्र असतो की तो अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू जाऊ शकतो.
गरुड घंटीचे विशेष महत्त्व
आपण घरात जी घंटी वापरतो त्यावर गरुड पक्षाची आकृती असते, म्हणून तिला गरुड घंटी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, गरुड हा भगवान विष्णूंचे वाहन आहे. त्यामुळे या घंटीचा नाद भक्तांचा संदेश प्रत्यक्ष भगवान विष्णूपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच हिंदू संस्कृतीत प्रत्येक मंगल कार्यात आणि पूजेमध्ये घंटीचा नाद अनिवार्य मानला जातो.
( स्पष्टीकरण : ही संपूर्ण बातमी धार्मिक परंपरा आणि समजुतीवर आधारित आहे. NDTV नेटवर्क या मजकुराची पृष्टी करत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world