Shiv Jayanti 2026: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे शहर तत्कालीन हिंदवी स्वराज्याचा भाग नसले, तरी इतिहासाच्या दृष्टीने या ठिकाणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या आठ वर्षेपूर्वी म्हणजेच एप्रिल 1666 मध्ये त्यांच्या आग्रा मोहिमेदरम्यान याच ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यासाठी जनसागराचा महापूर लोटला होता. मुघल प्रांताची (दख्खन) तत्कालीन राजधानी असलेल्या या शहरात महाराजांच्या आगमनावेळी झालेली प्रचंड गर्दी ही मराठा योद्धा राजाच्या वाढत्या वर्चस्वाचा आणि लोकप्रियतेचा पुरावा होती. कारण महाराजांची आग्रा स्वारी अतिशय महत्त्वाची मानली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजीनगर भेटीचे वर्णन
औरंगाबाद शहराचे नाव पूर्वी मुघल शासक औरंगजेबाच्या नावावरून ठेवण्यात आले होते. मुघल प्रशासनातील अधिकारी भीमसेन सक्सेना यांनी आपल्या 'तारीख-ए-दिलकुश' या पारशी संस्मरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) भेटीचे वर्णन केले आहे. पुढे इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला.
(नक्की वाचा: Happy Shiv Jayanti 2026 Wishes: शौर्य आणि पराक्रमाचा वारसा, शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश)
छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी गर्दी
या संस्मरणामध्ये शिवाजी महाराजांच्या घोडदळ आणि त्यांच्याबाबत जनतेमध्ये असलेला उत्साह याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. ही भेट मुघल सुभेदार मिर्झा राजा जयसिंग यांच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहाचा परिणाम होती, ज्यानुसार शिवाजी महाराजांना आग्र्यात औरंगजेबाची भेट घ्यायला जावे लागणार होते. एप्रिल 1666 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधील मुक्कामादरम्यान महाराजांसोबत 500 सुसज्ज आणि सशस्त्र सैनिक होते, ज्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली होती. आग्रा येथील आमेर राज्याचे (वर्तमान जयपूर) अधिकारी परकालदास यांनी 29 मे 1666 रोजी दुसऱ्या एका अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्रातही याचा उल्लेख आढळतो. त्यानुसार शिवाजी महाराज यांच्यासोबत 200 ते 250 लोक होते, ज्यात 100 घोडेस्वारांचा समावेश होता.
(नक्की वाचा: Shiv Jayanti 2026 Wishes 25+: सह्याद्रीचा सिंह गर्जतो! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश)
छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?त्यांच्या ताफ्यात सोने-चांदीने मढवलेली एक पालखी, हौदा असलेले दोन हत्ती, सामान वाहून नेणारे काही उंट आणि सुवर्णजडित भगवा ध्वजाचा समावेश होता. परकालदास यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन काटक, गोरे आणि अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व असे केले आहे. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीचाही उल्लेख केला आहे. परकालदास यांनी पत्रात लिहिले आहे की, "ते नेमके कोण आहेत हे माहित नसतानाही, त्यांना पाहून ते जनतेचे तारणहार आणि राज्यकर्ते आहेत, याची जाणीव सहज होते." हे पत्र जदुनाथ सरकार लिखित 'राजस्थानी रेकॉर्ड्स'चा भाग असून यामध्ये मराठा योद्ध्याच्या प्रसिद्ध आग्रा भेटीचे वर्णन आहे.
(Content PTI Bhasha)