Shiv Jayanti 2026 Date: राज्यात सध्या शिवजयंतीचे वारे वाहू लागले असून शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नेमकी कधी साजरी करायची, याबाबत शिवप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही लोक तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतात, तर काही जण तिथीनुसार साजरी करण्याला प्राधान्य देतात. या दोन्ही दिवसांचे महत्त्व आणि 2026 मधील या तारखांबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारीला जल्लोष
महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांची अधिकृत जन्मतारीख १९ फेब्रुवारी ही निश्चित केली आहे. इतिहासकार आणि तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या सखोल संशोधनानंतर 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी असते आणि सरकारी स्तरावर तसेच विविध मंडळांमार्फत मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. 2026 मध्ये ही शासकीय शिवजयंती गुरुवारी येत आहे.
( नक्की वाचा : कोण होता Tipu Sultan? ज्याच्या दहशतीमुळे आजही एक संपूर्ण समुदाय दिवाळीत पाळतो सूतक, वाचा हा इतिहास )
तिथीनुसार 6 मार्च रोजी सोहळा
दुसरीकडे, अनेक शिवभक्त आणि पारंपरिक संघटना हिंदू पंचांगानुसार शिवजयंती साजरी करतात. पंचांगानुसार शिवरायांचा जन्म शालिवाहन शक 1551 मधील फाल्गुन वद्य तृतीयेला झाला होता. 2026 मध्ये ही तिथी 6 मार्च रोजी येत आहे. त्यामुळे तिथीला महत्त्व देणारे भाविक शुक्रवारी 6 मार्चला शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा करतील. दरवर्षी तिथीनुसार येणारी तारीख बदलत असल्याने पंचांग पाहून हा दिवस निश्चित केला जातो.
किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर शिवभक्तांची गर्दी वाढू लागते. विशेषतः महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी रोजी मोठी गर्दी असते. यासोबतच रायगड, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा लागोपाठ सुट्ट्या आल्याने अनेक पर्यटकांनी आणि शिवभक्तांनी किल्ल्यांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे.
( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )
दोन आठवडे चालणार सांस्कृतिक उत्सव
शासकीय तारीख 19 फेब्रुवारी आणि तिथीनुसार 6 मार्च या दोन्ही दिवसांच्या मधल्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शिवमय वातावरण असते. सुमारे दोन आठवडे विविध शहरांमध्ये पोवाडे, व्याख्याने, मिरवणुका आणि शिवकालीन खेळांची प्रदर्शने भरवली जातात. नवीन पिढीला शिवरायांचा इतिहास कळावा यासाठी अनेक संस्था या काळात विशेष उपक्रम राबवतात. प्रशासनाने देखील या मोठ्या उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.