WiFi health effects at night: आजच्या काळात इंटरनेट ही आपल्या जीवनाची गरज बनली आहे. प्रत्येक घरात 24 तास वायफाय सुरू असतो आणि आपले मोबाईलही सतत इंटरनेटशी जोडलेले असतात. मात्र, अलीकडे एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे की, रात्री झोपताना वायफाय किंवा मोबाईल इंटरनेट बंद करणे खरोखर गरजेचे आहे का? हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की केवळ लोकांमध्ये पसरलेला एक भीतीचा भाग आहे, याचा उलगडा विज्ञानाच्या आधारे करणे आवश्यक आहे. याबाबत वेगवेगळ्या संशोधनाचे निष्कर्ष उघड झाले आहेत. त्या आधारे आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि मानवी शरीर
मुळात वायफाय आणि मोबाईल नेटवर्कमधून ईएमएफ म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड उत्सर्जित होत असते. हे एक प्रकारचे नॉन आयोनायझिंग रेडिएशन असते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, या रेडिएशनमध्ये इतकी ताकद नसते की ते आपल्या शरीरातील डीएनएला थेट नुकसान पोहोचवू शकतील.
तरीही, दीर्घकाळ या लहरींच्या संपर्कात राहिल्यामुळे मानवी आरोग्यावर, विशेषतः झोप आणि मेंदूच्या कार्यावर काय परिणाम होतो, यावर जगभरात अनेक संशोधनं सुरू आहेत.
( नक्की वाचा : फ्लॅटधारकांनो, बिल्डरच्या NOCची वाट पाहताय? जाणून घ्या परवानगीशिवाय सोसायटी कशी स्थापन करायची? )
झोपेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम
काही संशोधने असे सुचवतात की ईएमएफ लहरींमुळे झोपेच्या चक्रात थोडा बदल होऊ शकतो. आपल्या शरीरात झोप निर्माण करण्यासाठी मेलाटोनिन नावाचे हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. या लहरींचा प्रभाव या हार्मोनवर पडू शकतो, अशी शक्यता काही अभ्यासात वर्तवण्यात आली आहे.
परंतु, बहुतांश तज्ञांचे असे मत आहे की घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वायफाय सिग्नलची तीव्रता अत्यंत कमी असते आणि ती आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांच्या आतच असते, त्यामुळे घाबरण्याचे मोठे कारण नाही.
( नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )
मुले आणि गर्भवती महिलांसाठी खबरदारी
मुलांच्या मेंदूचा विकास होत असतानाच्या काळात त्यांना अशा लहरींपासून दूर ठेवणे हिताचे मानले जाते. म्हणूनच काही डॉक्टर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वायफायपासून ठराविक अंतर राखण्याचा सल्ला देतात.
मात्र, रात्री वायफाय सुरू ठेवल्यामुळे थेट कोणताही मोठा आजार किंवा गंभीर इजा झाल्याचा ठोस पुरावा अद्याप कोणत्याही संशोधनातून समोर आलेला नाही. तरीही खबरदारी म्हणून रात्री इंटरनेट बंद करणे हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
कॅन्सरचा धोका आणि जागतिक आरोग्य संघटनेचे मत
मोबाईल किंवा वायफायच्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो का, हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतरही या लहरी आणि कॅन्सर यांचा थेट संबंध प्रस्थापित झालेला नाही. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओने वायफाय लहरींना संभाव्य कॅन्सरकारक (Group 2B) श्रेणीत ठेवले आहे.
विशेष म्हणजे कॉफी आणि लोणचे देखील याच श्रेणीत येतात. याचा अर्थ असा की, यापासून असलेला धोका खूप मोठा नाही, परंतु या विषयावर अधिक सखोल संशोधनाची गरज आहे.
इंटरनेट बंद करण्याचे व्यवहार्य फायदे
आरोग्यासोबतच रात्री वायफाय किंवा मोबाईल डेटा बंद ठेवण्याचे काही इतर फायदेही आहेत. राउटर 24 तास सुरू राहिल्यामुळे काही प्रमाणात वीज खर्च होते, जो बंद केल्यास वाचवता येतो. तसेच तांत्रिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केला तर, रात्री इंटरनेट बंद ठेवल्यामुळे हॅकिंगचा धोका कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फोनमधील नोटिफिकेशन्स आणि पिंग बंद झाल्यामुळे मेंदूला शांतता मिळते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world