जाहिरात

Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Pune News: पुणे शहरात मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. पुणे पोलिसांनी या बातम्यांचे खंडन केले असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Pune News: पुणे शहरात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करत एक अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही टोळीचे अस्तित्व नसून या निव्वळ अफवा आहेत.

पुणे शहरात मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, पुणे शहर पोलिसांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे स्पष्ट केले आहे.

अफवांचे पोलिसांनी केले खंडन

पुणे शहर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, शहरात मुलांचे अपहरण झाल्याची कोणतीही अधिकृत नोंद किंवा तक्रार नाही. या केवळ दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात घबराट पसरवण्यासाठी पसरवल्या जात असलेल्या अफवा आहेत. नागरिकांनी शांतता राखण्यासाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी खालील नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

(नक्की वाचा-  Dombivli News: डोंबिवलीत बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश, रुग्णांच्या जीवाशी खेळ; बिहार कनेक्शन उघड)

पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना

अफवांवर विश्वास ठेवू नका: कोणत्याही पुष्टी न मिळालेल्या माहितीवर किंवा भीती निर्माण करणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.
मेसेज फॉरवर्ड करू नका: सोशल मीडिया, व्हॉट्सॲपवर आलेले संशयास्पद मेसेज खातरजमा केल्याशिवाय कोणालाही पाठवू नका.
पोलिसांशी संपर्क साधा: जर तुम्हाला काही संशयास्पद हालचाल दिसली किंवा तातडीची मदत हवी असल्यास, जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

अधिकृत माहितीसाठी येथे संपर्क करा

नागरिकांनी केवळ पुणे शहर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर (X), फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरील माहितीवरच विश्वास ठेवावा. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com