Phone Heating Issues Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत स्मार्टफोन गरम होणे ही एक सामान्य समस्या आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ कडक उन्हात फोन वापरणे, मोठ्या फाइल्स डाऊनलोड करणे, खूप वेळ गेम खेळणे, व्हिडीओ स्ट्रीमिंग, सततचा वापर किंवा फास्ट चार्जरच्या वापरामुळेही फोन गरम होतो. याशिवाय वायरलेस चार्जिंग, मोबाइल हॉटस्पॉटचा वापर, बॅकग्राउंडमध्ये जास्त अॅप्स सुरू असणे ही देखील ओव्हरहीटिंगची कारणे असू शकतात. पण अनेकदा लोक फोन गरम झाल्यावर अशा काही चुका करतात, ज्या डिव्हाइस आणि बॅटरी दोघांसाठीही घातक ठरू शकतात. अशा परिस्थितीत जर तुमचा फोनही गरजेपेक्षा जास्त गरम होत असेल, तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
फोन गरम झाल्यावर काय करू नये? Smartphone Overheating Issues
1. फोन चार्जिंगला लावू नका
जर फोन आधीपासूनच गरम असेल, तर तो लगेच चार्जिंगला लावण्याची चूक करू नका. चार्जिंग दरम्यान बॅटरीवर जास्त ताण पडतो, ज्यामुळे तापमान आणखी वाढू शकते. आधी फोन थंड होऊ द्या, मगच चार्ज करा.
2. फ्रिज, फ्रीझर किंवा एसीच्या अगदी समोर ठेवू नका
अनेक लोक फोन गरम झाल्यावर तो एसी समोर धरतात, तर काही जण फोन लवकर थंड करण्यासाठी तो थेट फ्रिज किंवा फ्रीझरमध्ये ठेवतात. ही अतिशय वाईट सवय आहे. अचानक तापमान बदलल्यामुळे फोनच्या आत ओलावा निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे इंटरनल पार्ट्स खराब होण्याचा धोका वाढतो.
(नक्की वाचा : VIDEO: ऐन उन्हाळ्यात पहाटेपर्यंत छळ! नवी मुंबईच्या उलवेतील तरुणीचा तो VIDEO VIRAL, ढसाढसा रडत सत्य उजेडात आणलं)
3. अलर्ट मेसेजकडे दुर्लक्ष करू नका
अनेक स्मार्टफोन जास्त गरम झाल्यावर स्क्रीनवर 'ओव्हरहीटिंग'चा इशारा (अलर्ट) देतात. अशा वेळी फोनचा ब्राइटनेस कमी होऊ शकतो, चार्जिंग थांबू शकते आणि काही फीचर्स बंद होऊ शकतात. या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या फोनमध्ये असा कोणताही अलर्ट आला, तर फोनचा वापर त्वरित बंद करा.
4. बॅकग्राउंडमध्ये अनेक अॅप्स सुरू ठेवू नका
एकाच वेळी अनेक अॅप्स सुरू असल्यास प्रोसेसर सतत काम करत राहतो. यामुळे फोन अधिक गरम होऊ शकतो. वापरत नसलेले अॅप्स बंद करा, तसेच अनावश्यक फाइल्स,अॅप्स डिलीट करत राहा.
(नक्की वाचा: Weather Alert: बापरे! 15 जूनपर्यंत चिंता कायम, उष्णतेची लाट की पावसाचा दिलासा? शेतकरी,सामान्यांसाठी मोठा इशारा)
फोन गरम झाल्यावर काय करावे?
- सर्वात आधी फोनचा वापर काही वेळासाठी पूर्णपणे बंद करा.
- गरज भासल्यास फोन 10-15 मिनिटांसाठी स्विच ऑफ (बंद) करून ठेवा.
- वाय-फाय (Wi-Fi), ब्लूटूथ (Bluetooth) आणि जीपीएस (GPS) यासारख्या सुविधा बंद करा आणि स्क्रीनचा ब्राइटनेस देखील कमी करा.
- जर फोनला कव्हर (केस) घातलेले असेल, तर ते देखील काढून टाका, जेणेकरून आतील उष्णता सहजपणे बाहेर पडू शकेल.
Photo Credit: Echion
या गोष्टींचीही काळजी घ्या
1. खराब चार्जर आणि केबलचा वापर करू नका
खराब झालेली USB केबल, लोकल चार्जर किंवा खराब बॅटरी ही ओव्हरहीटिंगची मोठी कारणे ठरू शकतात. चांगल्या दर्जाचे चार्जर आणि केबलचाच वापर करा.
2. चार्जिंगदरम्यान गेमिंग किंवा व्हिडीओ पाहू नका
अनेक लोक फोन चार्ज होत असताना गेम खेळतात किंवा व्हिडीओ पाहत राहतात, यामुळे प्रोसेसर आणि बॅटरी दोन्हीवर एकाच वेळी ताण पडतो. यामुळे फोन वेगाने गरम होतो आणि बॅटरीवरही वाईट परिणाम होऊ शकतो.
3. थेट उन्हात फोनचा वापर करू नका
उन्हामध्ये जास्त वेळ फोन वापरल्याने त्याचे तापमान वेगाने वाढते. विशेषतः कारच्या डॅशबोर्डवर, बाइकवर किंवा खुल्या मैदानात फोन उन्हात ठेवणे धोकादायक ठरू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)