SMS Fraud: भारतामध्ये ऑनलाईन फसवणुकीचा धोका दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढताना दिसत आहे. आता सायबर गुन्हेगार केवळ बनावट कॉल करून नागरिकांना फसवत नसून, थेट टेक्स्ट मेसेज म्हणजेच एसएमएसच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालत आहेत. एका नवीन अहवालानुसार, 2025 च्या दुसऱ्या टप्प्यापासून ते 2026 च्या पहिल्या टप्प्यादरम्यान देशात एसएमएसवर आधारित स्कॅममध्ये तब्बल 146 टक्के आणि एकूण मोबाईल फ्रॉडमध्ये 67 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे.
आयफोन वापरकर्तेही सुरक्षित नाहीत
सायबर सुरक्षेशी संबंधित बायोकॅच संस्थेच्या अहवालानुसार, मोबाईल फ्रॉडच्या घटनांमध्ये आता आयफोन वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे. आयओएस उपकरणांवरील फसवणुकीच्या घटनांमध्ये 86 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे, तर अँड्रॉइड उपकरणांवर हा आकडा 35 टक्के इतका आहे. यावरून हे स्पष्ट होते की, आता केवळ अँड्रॉइडच नव्हे तर अतिशय सुरक्षित समजले जाणारे आयफोन वापरकर्तेही सायबर भामट्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
( नक्की वाचा : Covid 19: कोरोनाचा पुन्हा अलर्ट! एकाच वेळी अनेक राज्यांत रुग्ण वाढले; नेमकी काय आहेत लक्षणे? A to Z माहिती )
कमी वेळेत मोठी रक्कम लुटण्याचा नवा पॅटर्न
या अहवालातील माहितीनुसार, सायबर गुन्हेगार आता अत्यंत कमी वेळेत जास्त रक्कम लुटण्यावर भर देत आहेत. भामट्यांचा एक फसवणुकीचा सेशनचा सरासरी वेळ 32 टक्क्यांनी घटला आहे, परंतु एकाच वेळी ट्रान्सफर केली जाणारी रक्कम मात्र 1.7 पट वाढली आहे.
दुसऱ्या बाजूला, वेब ब्राऊझरद्वारे होणाऱ्या फसवणुकीत 10 टक्क्यांची घट झाली आहे, ज्याचा अर्थ सायबर गुन्हेगार आता मोबाईल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहेत.
लाखो म्युल खाती
देशभरातील विविध तपासादरम्यान 2025 या वर्षात 700 पेक्षा जास्त बँक शाखांमध्ये तब्बल 8.5 लाख हून अधिक म्युल खाती उघडकीस आली आहेत. संपूर्ण वर्षात सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारींमधील एकूण रक्कम 22496 कोटी रुपये इतक्या प्रचंड टप्प्यावर पोहोचली आहे.
या काळात एकूण 26.48 लाख म्युल खात्यांची प्रकरणे समोर आली. मात्र, संशयास्पद व्यवहारांवर सतत ठेवण्यात आलेल्या नजरेमुळे सुमारे 9055 कोटी रुपयांची फसवणूक रोखण्यात यश आले आहे.
SMS स्कॅम का होतात यशस्वी?
बायोकॅचचे तज्ज्ञ टॉम पीकॉक यांच्या मते, सामान्य लोक एसएमएसला एक अत्यंत विश्वासार्ह माध्यम मानतात. याच गोष्टीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. बनावट मेसेजदेखील हुबेहूब कंपनीच्या मूळ मेसेजसारखेच बनवले जातात, ज्यामुळे लोक न विचार करता त्यावर विश्वास ठेवतात.
आता गुन्हेगार ऑटोमेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना विचार करण्यासाठी वेळच देत नाहीत आणि काही मिनिटांत पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात.

यूपीआय आणि मोबाईल बँकिंगवर सायबर भामट्यांचा डोळा
भारतात यूपीआय, मोबाईल बँकिंग, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन गुंतवणुकीच्या सुविधांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. यामुळे डिजिटल पेमेंट व्यवस्था जितकी सुलभ झाली आहे, तितकेच सायबर गुन्हेगारांसाठी गैरफायदा घेण्याचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. पण, रिझर्व्ह बँक, सायबर क्राईम संस्था, बँका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वाढत्या समन्वयामुळे अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world