Stop College Education After 12th: 12 वी नंतर पुढे कॉलेजचे शिक्षण घेणे लगेच थांबवा... एका आघाडीच्या दिग्गज गुंतवणूकदाराने देशातील कोट्यवधी मध्यमवर्गीय तरुणांना आणि पालकांना थेट हाच धक्कादायक सल्ला दिला आहे. मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) सौरभ मुखर्जी यांनी एका पॉडकास्टमध्ये हा खळबळजनक दावा केला आहे.
सध्याच्या काळात भारतात सर्वाधिक कमाई करणारे लोक हे मोठे पदवीधर नसून, ज्यांनी 12 वी नंतर कॉलेजमध्ये न जाता शिक्षण थांबवले आहे, असा दावा मुखर्जी यांनी केलाय. देशातील सध्याची पदवी केवळ बेरोजगारी वाढवण्याचे साधन बनल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.
काय सांगितलं कारण?
हा सल्ला देण्यामागे सौरभ मुखर्जी यांनी देशातील नोकऱ्यांची आणि बेरोजगारीची जी आकडेवारी मांडली आहे, ती वाचून कोणालाही मोठा धक्का बसेल. देशातील डेटाचा हवाला देत ते म्हणाले की, कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या दर 100 तरुणांपैकी केवळ 3 तरुणांना त्यांच्या पदवीच्या वर्षात नोकरी मिळत आहे.
आजच्या घडीला भारतातील पदवीधरांचा बेरोजगारीचा दर तब्बल 30 ते 40 टक्के इतका प्रचंड आहे, तर याउलट ज्यांना लिहिता-वाचता येत नाही अशा निरक्षर लोकांमध्ये बेरोजगारीचा दर केवळ 3 टक्के आहे. त्यामुळे भारतात विद्यापीठांमध्ये जाऊन पदवी मिळवण्यापेक्षा कॉलेजमध्ये न जाणेच अधिक शहाणपणाचे ठरत आहे, असा थेट युक्तिवाद त्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
कशामुळे होतोय घात?
सौरभ मुखर्जी यांनी आपल्या शिक्षण पद्धतीला कौशल्य वाढवणारी नाही तर केवळ 'रट्टा मारण्याची' (घोकमपट्टीची) प्रक्रिया म्हटले आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये फक्त पाठांतर करून परीक्षेत तेच ओकण्याचे शिक्षण दिले जाते. आजचे जग हे एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), बायोटेक, क्लीन टेक आणि प्रगत विज्ञानाचे आहे,
पण आपली शिक्षण पद्धती तरुणांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवतच नाही. त्यामुळे कंपन्यांना कॉलेजच्या पदवीमध्ये आता काहीही मूल्य दिसत नसून, पदवीचे कागद घेऊन फिरणारे तरुण नोकरीसाठी अपात्र ठरत आहेत.
( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )
ऑफिसमधील पदवीधरापेक्षा मजूर कमावतोय दुप्पट
आपल्या 'ब्रेकपॉईंट' (Breakpoint) या पुस्तकातील उदाहरणांचा संदर्भ देत मुखर्जी यांनी मुंबईच्या बाजारपेठेचे वास्तव मांडले आहे. त्यांनी सांगितले की, एसी ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या एका पदवीधर तरुणाला जेवढा पगार मिळतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पगार 12 वी नंतर शिक्षण सोडलेला तरुण कमावत आहे.
मुंबईत एखाद्या बांधकाम क्षेत्रावर (कन्स्ट्रक्शन साईट) काम करणारा सामान्य मजूर हा ऑफिसमधील पदवीधरापेक्षा दुप्पट पैसे कमावतो, तर एक जेसीबी (JCB) ऑपरेटर त्याहूनही मोठी कमाई सहज करत आहे.
हा केवळ शिक्षणाचा खेळ नसून देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठा धोका आहे. भारताला जर जगात टिकायचे असेल, तर केवळ पाठांतराच्या जोरावर पदव्या वाटणे बंद करावे लागेल आणि तरुणांना नव्या काळाची कौशल्ये देऊन विचार करायला शिकवावे लागेल, असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
इथे पाहा संपूर्ण VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world