
Toilet Phone Scrolling Health Risk: अनेकांना टॉयलेटमध्ये बसल्यावर मोबाईल स्क्रोल करण्याची सवय असते. पण, एका नव्या अभ्यासानुसार या सवयीमुळे मूळव्याधीचा धोका 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ज्यामुळे रक्तस्राव, खाज आणि वेदना होऊ शकतात. टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने पेल्विक फ्लोअरवर दबाव वाढतो, ज्यामुळे गुदद्वारातील रक्त जमा होते आणि मूळव्याधीचा धोका वाढतो.
युनायटेड स्टेट्समध्ये 45 वर्षांवरील 125 प्रौढांवर हा अभ्यास करण्यात आला. ज्या लोकांनी कोलोनोस्कोपी केली होती, अशा लोकांचा यात समावेश होता. संशोधकांनी टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची त्यांची सवय तपासली आणि त्याचा मूळव्याधीच्या लक्षणांशी संबंध जोडला.
कोलोनोस्कोपी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी मोठ्या आतड्याचे आणि मलाशयाचे परीक्षण करण्यासाठी कॅमेराने सुसज्ज असलेल्या लांब, पातळ, लवचिक ट्यूब वापरते. यामुळे डॉक्टर स्क्रीनवर कोलोनच्या आत पाहू शकतात आणि जळजळ, पॉलीप्स किंवा कर्करोग यासारख्या समस्या शोधू शकतात.
अभ्यासात काय आढळले?
या अभ्यासात सहभागी झालेल्या दोन-तृतीयांश (66 टक्के) लोकांनी टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरत असल्याचे सांगितले. यातील सर्वाधिक लोक (54.3 टक्के) बातम्या वाचत होते, तर 44.4 टक्के लोक सोशल मीडिया वापरत होते.
जे लोक स्मार्टफोन वापरत होते, ते टॉयलेटमध्ये मोबाईल न वापरणाऱ्यांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसले होते. स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी एक-तृतीयांशहून अधिक (37.3 टक्के) लोक 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये होते, तर स्मार्टफोन न वापरणाऱ्यांपैकी फक्त 7 टक्के लोकच एवढा वेळ बसले होते.
स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांमध्ये मूळव्याधीचा धोका, स्मार्टफोन न वापरणाऱ्यांच्या तुलनेत 46 टक्के जास्त असल्याचे दिसून आले. संशोधकांनी वय, वजन, शारीरिक हालचाल, ताण आणि फायबरचे सेवन यांसारख्या इतर घटकांचाही अभ्यास केला, परंतु तरीही स्मार्टफोन वापरण्यामुळे धोका वाढल्याचे आढळले.
मूळव्याध होण्याची इतर कारणे
- फक्त मोबाईल वापरणे हे मूळव्याधीचे एकमेव कारण नाही. इतर अनेक कारणांमुळे देखील मूळव्याध होऊ शकतो.
- 45 वर्षांवरील व्यक्तींमध्ये मूळव्याध होण्याची शक्यता जास्त असते.
- गरोदरपणामुळे ओटीपोटावर दबाव वाढतो.
- स्थूलपणामुळेही मूळव्याध होऊ शकते.
- सतत अपचन किंवा जुलाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनाही हा आजार होऊ शकतो.
- शौचाला त्रास झाल्यास जोर लावल्यानेही मूळव्याध होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world