जाहिरात

Summer Health Advice : सूर्याचा कडाका वाढला! 40 अंशात स्वतःला कसं 'कूल' ठेवायचं? जाणून घ्या 8 खास फॉर्म्युले

Heatstroke Prevention Tips: सूर्याचा कडाका वाढल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Summer Health Advice : सूर्याचा कडाका वाढला! 40 अंशात स्वतःला कसं 'कूल' ठेवायचं? जाणून घ्या  8 खास फॉर्म्युले
Heatstroke Prevention Tips:  विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना हे नियम पाळणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग:

Heatstroke Prevention Tips:  कडक उन्हाचा चटका आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेपासून आता कोकणही सुटलेले नाही. येत्या 22 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सूर्याचा कडाका वाढल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघाताचा फटका टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

उन्हाच्या झळांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा?

सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. उन्हाचा पारा चढलेला असताना शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काही नियम पाळले तर आपण उष्माघातासारख्या धोक्यापासून दूर राहू शकतो.

उष्माघातापासून वाचण्यासाठी या 8 गोष्टी नक्की करा

1) पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
2) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
3) दुपारी 12 ते 3 वाजे दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
4) सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
5) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
6) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
7) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
8) उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

काय टाळणे हिताचे ठरेल?

केवळ काय करावे एवढेच पुरेसे नाही, तर उन्हाळ्यात काय टाळावे हे समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. उन्हात अति कष्टाची कामे करणे टाळावे. शरीर निर्जलीकरण (Dehydration) होण्यापासून वाचवण्यासाठी दारू, चहा, कॉफी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करणारी कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. जेवणामध्ये उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते.

लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि प्राण्यांची काळजी

उन्हाच्या काळात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात कधीही सोडू नका, कारण वाहनांमधील तापमान वेगाने वाढून जीवघेणे ठरू शकते. तसेच घरातील पाळीव गुरांना सावलीत ठेवावे आणि त्यांना पुरेसे पाणी मिळेल याची खात्री करावी. गरोदर स्त्रिया आणि आजारी व्यक्तींनी या काळात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. चक्कर येणे, सतत घाम येणे किंवा डोकेदुखी जाणवल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com