How To Use AC In Summer: उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी बहुतांश लोक घरामध्ये एसी (AC) लावतात, पण विजेच्या बिलाची चिंता देखील असते. त्यामुळे खोली थंड झाल्यानंतर काही लोक थोड्या वेळाने एसी बंद करतात. पण एसी बंद करताच काही वेळातच खोली पुन्हा गरम होऊ लागते. असे का होते? याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या खोलीच्या भिंती, फरशी आणि फर्निचर, जे दिवसभर उष्णता शोषून घेतात. एसी बंद होताच ही उष्णता बाहेर पडू लागते आणि खोली पुन्हा तापते. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही एसी बंद केल्यानंतरही तुमची खोली बराच काळ थंड ठेवू शकता.
How To Use AC: एसी बंद केल्यानंतर खोली थंड कशी ठेवावी? (Follow These Steps To Cool Your Room)
1. पडदे आणि ब्लाइंड्सचा योग्य वापर करा
दिवसा सूर्याची किरणे थेट रूममध्ये येतात, ज्यामुळे खोली गरम होते. अशा वेळी रूमला उन्हापासून वाचवण्यासाठी जाड पडदे किंवा ब्लॅकआउट कर्टेन्सचा वापर करा. हे पडदे बाहेरची उष्णता आणि प्रखर ऊन आत येण्यापासून रोखतात, ज्यामुळे खोली थंड राहते.
2. दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा
जेव्हा एसी सुरू असेल, तेव्हा खोलीचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद ठेवा. तसेच वारंवार खोलीबाहेर ये-जा करणे टाळा. यामुळे आतली थंड हवा बाहेर जाणार नाही आणि बाहेरची गरम हवा आत येणार नाही, परिणामी रूम जास्त वेळ थंड राहील.
3.पंख्याचा स्मार्ट वापर करा
एसी बंद केल्यानंतर लगेच पंखा सुरू करा. यामुळे खोलीतील साचलेली थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते आणि थंडावा टिकून राहतो.
4. भिंती आणि छत थंड ठेवा
शक्य असल्यास घराचे छत थंड ठेवण्यासाठी 'कूल रूफ कोटिंग' किंवा पांढऱ्या रंगाचे पेंट लावा. पांढरा रंग सूर्याची उष्णता कमी शोषतो, ज्यामुळे खोली लवकर गरम होत नाही.
5. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर कमी करा
खोलीतील टीव्ही, लॅपटॉप किंवा जास्त दिवे (Lights) देखील उष्णता निर्माण करतात. त्यामुळे गरज नसेल तेव्हा या वस्तू बंद ठेवा
6. खोलीत रोपे ठेवा
तुमची खोली नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्यासाठी मनी प्लांट किंवा कोरफड (Aloe Vera) यासारखी इनडोअर रोपे लावा. ही रोपे केवळ थंडावाच देत नाहीत, तर हवा देखील शुद्ध ठेवतात.
Photo Credit: NDTV Marathi
7. कॉटन बेडशीट आणि हलक्या कापडाचा वापर करा
खोलीत जड कापडाऐवजी सुती (Cotton) चादरी आणि वजनाने हलक्या असणाऱ्या पडद्यांचा वापर करा. सुती कापड उष्णता शोषत नाही आणि खोली थंड ठेवण्यास मदत करते.
8. रात्रीच्या वेंटिलेशनचा फायदा घ्या
रात्रीच्या वेळी बाहेरची हवा थंड असते, त्यामुळे रात्री खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून ताजी आणि थंड हवा खोलीत येईल. यामुळे खोलीचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )