Success Story: आपल्या देशात सहसा एक गोष्ट खूप सहजतेने बोलली जाते की शेती-भाजीपाल्याचा व्यवसाय म्हणजे तोट्याचा व्यवहार. गावातील तरुण असो वा शहरातील लोक, सर्व हेच मानतात की मातीत फक्त घाम गळतो पण पैसा मिळत नाही. पण मातीशी जोडलेल्या दोन सख्ख्या भावांची कथा प्रेरणादायी ठरेल. या भावांनी मल्टिनॅशनल बँकेच्या लाखो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःच्याच जमिनीतून तब्बल 800 कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले. पुण्यातील सत्यजित हांगे आणि अजिंक्य हांगे या भावांची यशोगाथा आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत, ज्यांना आज जग 'टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म्स' (Two Brothers Organic Farms) या नावाने ओळखते.
गावावर प्रेम आणि दोन भावांचा निर्णय
कथा सुरू होते महाराष्ट्रातील 'भोडणी' या एका छोट्याशा गावातून. हांगे बंधूंचे वडील मागील 40 वर्षांपासून शेती करत होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जोडून दोन्ही मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले आणि एमबीए (MBA) पर्यंतचे शिक्षण दिले. दोन्ही भावांना मोठ्या शहरांमध्ये उत्कृष्ट नोकरी मिळाली. एसी रूम, आलिशान गाड्या, दर महिन्याला खात्यात येणारा मोठा पगार, आयुष्यात सर्व काही सेट होते.
पण जेव्हा जेव्हा हे दोन्ही भाऊ दिवाळीच्या सुटीमध्ये गावी येत तेव्हा त्यांचे पुन्हा शहरात जाण्याचे मन होत नसे. लहान भाऊ अजिंक्यने एक दिवस अचानक मोठा निर्णय घेतला की,"मला नोकरी करायची नाही, मी गावी जाऊन शेती करेन." त्याच्या एका वर्षानंतर मोठा भाऊ सत्यजितनेही राजीनामा दिला. दोन्ही भाऊ गावी परत आले. त्यावेळेस गावात एकच खळबळ उडाली. लोक म्हणू लागले, "शिकून-सवरून डोके खराब झाले आहे. एवढी मोठी नोकरी सोडून म्हशी चरायला आले." आई-वडीलही काळजीत होते की मुलांनी आयुष्य पणाला लावले आहे.
पहिल्या वर्षी झाले मोठे नुकसान
दोन्ही भावांनी पाहिले की शेतात विष (केमिकल्स आणि पेस्टिसायड्स) कालवले जात आहे, ज्यामुळे जमिनीत पोत खराब होत आहे. तेव्हा त्यांनी ठरवले की ते फक्त सेंद्रिय (ऑरगॅनिक) शेती करतील. ते देशी गायी घेऊन आले, शेण आणि गोमूत्रापासून खत बनवले. रात्र-न्-दिवस मातीसाठी राबले, शेण उचलले. जो आनंद त्यांना एसी ऑफिसमध्ये मिळाला नव्हता, तो या शेण-मातीत मिळत होता.
तीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर पपईचे पहिले पीक तयार झाले. फळे खूप गोड होती, पण केमिकलचा वापर नसल्यामुळे फळांवर थोडे डाग होते. दोन्ही भाऊ मोठ्या उत्साहाने एक संपूर्ण ट्रक भरून पहाटे 4 वाजता मार्केटमध्ये पोहोचले.
(नक्की वाचा : VIDEO: वयाच्या 25व्या वर्षी 5 कोटींची कमाई! IIM बंगळुरूच्या विद्यार्थ्याने सांगितला श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला)
मार्केटमध्ये जे घडले, त्याने दोन्ही भाऊ हैराण झाले. व्यापाऱ्याने पावती हातावर टेकवली, भाव मिळाला फक्त चार रुपये किलो. सत्यजितने थक्क होऊन विचारले, "एवढे उत्तम, बिनविषाचे फळ आहे, हा भाव का?" व्यापारी म्हणाला, "ग्राहक आधी डोळ्यांनी खातो, मग जिभेने. तुमचे फळ दिसायला चांगले नाही, भाव हाच मिळेल." तीन वर्षांच्या मेहनतीनंतर तो दिवस असा होता जणू कोणीतरी जोरदार कानशिलात लगावली असावी. संपूर्ण पीक विकल्यानंतर हातात फक्त 10 हजार रूपये आले".
वडिलांचे टोमणे
घरी परतले तर बँक बॅलन्स रिकामा झाला होता. शहरातून आणलेले 8 लाख रुपये संपले होते. वडिलांनी स्पष्ट सांगितले, "मी आयुष्यभर शेती केली आहे, यात काही सन्मान नाही, पैसा नाही. तुम्ही खूप मोठी चूक करत आहात." गावातील लोकही मागे राहिले नाहीत. वडिलांनी टोमणे मारत म्हटले की, "मोठे आले होते शहरातून ज्ञान वाटायला. केमिकल बंद करून सेंद्रिय शेती करत होते. पाहिले ना, पूर्ण ट्रक विकून फक्त 10 हजार रुपये आणले. विकून टाका जमीन आणि करा नोकरी."
हार न मानण्याची जिद्द: जेव्हा तूप आणि गुळाने बदलली बाजी
पण या दोन्ही भावांनी हार पत्करली नाही. त्यांनी फिलिप कॉटलर यांचे मार्केटिंगचे नियम फॉलो केले, त्यांना समजले की त्यांना एका नावाची, एका ब्रँडची गरज आहे. याच तळमळीतून जन्म झाला 'टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म्स' या ब्रँडचा.
त्यांना समजले की फक्त फळे-भाज्या विकून काम चालणार नाही, कारण त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेजचे पैसे नव्हते. त्यांनी त्यांच्या आईला विचारले की गावातील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वर्षभर खराब होत नाहीत? आईने मार्ग दाखवला - पारंपरिक पद्धतीने तयार केलेले 'देशी गायीचे तूप' आणि 'उसाचा गूळ'.
मुंबईच्या फ्लायओव्हरवरून 800 कोटी रुपयांची उडी
सुरुवातीला मुंबईच्या फ्लायओव्हरखाली फळे विकली, मग मुंबईच्या एका प्रदर्शनात (एक्झिबिशन) दोन टेबल लावून आपले तूप आणि गूळ विकणे सुरू केले. लोकांना जेव्हा त्यांच्या कथेची आणि शुद्धतेची जाणीव झाली, तेव्हा रांगा लागल्या. ते दर शनिवार-रविवार 350 किलोमीटर गाडी चालवून मुंबईला येत, दिवसभर उन्हात उभे राहून माल विकत आणि मग रात्री परत गावी जाऊन शेतात काम करत. हळूहळू त्यांनी आपली वेबसाइट सुरू केली. मग जे घडले, ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. बंगळुरू, दिल्ली, लखनौ संपूर्ण देशभरातून ऑर्डर्सचा पूर आला.
4 रुपयांवरून ₹800 कोटी रुपयांचा व्यवसाय
ज्या ब्रँडची सुरुवात घराच्या चुलीपासून झाली होती, आज गावात 60,000 स्क्वेअर फूटची मोठी फॅक्टरी उभी आहे. जे लोक कधी टोमणे मारायचे, आज त्याच गावातील 700 लोकांना हे दोन्ही भाऊ रोजगार देत आहेत. पुणे आणि मुंबईत त्यांचे ऑफिस आहेत. विचार करा, जी पपई त्यांनी पिकवली होती, त्या फळाला केवळ 4 रुपयांचा भाव मिळाला होता, आज त्याच संघर्षाच्या जोरावर त्यांच्या कंपनीचे व्हॅल्युएशन 800 कोटी रुपये झाले आहे.