UPSC CSE 2025 : अपघातात स्मृती गेली,पायही गमावले; 10 वर्षांनंतर नियतीला हरवून जिद्दी मुलगी झाली सरकारी अधिकारी

UPSC 2025 Success Story : तब्बल 10 वर्षांच्या संघर्षानंतर तिने जे यश मिळवलं आहे, ते समजल्यानंतर कोणाचेही डोळे पाणावतील

जाहिरात
Read Time: 3 mins
UPSC CSE 2025 : स्वतःचं नाव, शिक्षण आणि ओळख असं सर्व काही ती विसरून गेली होती.
मुंबई:

UPSC CSE 2025 : आयुष्यात कधी काय घडेल याचा नेमका अंदाज कोणालाच नसतो. एका क्षणात हसतं-खेळतं आयुष्य कसं पालटून जाऊ शकतं, याचा अनुभव एका तरुणीने घेतला. एका भीषण अपघाताने तिला फक्त व्हीलचेअरवरच खिळवून ठेवलं नाही, तर तिच्या स्मृतीवरही आघात केला. 

स्वतःचं नाव, शिक्षण आणि ओळख असं सर्व काही ती विसरून गेली होती. पण नियतीच्या या क्रूर खेळासमोर गुडघे न टेकता, तिने पुन्हा शून्यातून विश्व उभं केलं. तब्बल 10 वर्षांच्या संघर्षानंतर तिने जे यश मिळवलं आहे, ते ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील.

जिद्द आणि चिकाटीची ही कहाणी आहे केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय आथिरा सुगथन हिची. नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC CSE 2025 च्या निकालात आथिराने 483 वा रँक मिळवून इतिहास घडवला आहे. आथिराचा हा प्रवास सुखाचा नव्हता, तर तो वेदना, विस्मरण आणि अफाट आत्मविश्वासाचा होता.

एका अपघाताने बदललं आयुष्य

आथिरा फेब्रुवारी 2016 मध्ये  बेंगळुरूमध्ये बीडीएस (BDS) म्हणजेच दंतवैद्यकाचे शिक्षण घेत होती. एका रस्ते अपघाताने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली आणि ती व्हीलचेअरवर आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुढील 2 वर्षे ती स्मृतिभ्रंशाच्या (Amnesia) गर्तेत होती. 

Advertisement

आपण डॉक्टर होण्याचे शिक्षण घेत आहोत, हे देखील ती पूर्णपणे विसरली होती. कोझिकोडमध्ये परतल्यानंतर तिच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू झाले आणि हळूहळू तिची स्मृती परत येऊ लागली.

( नक्की वाचा : UPSC Exam 2025 : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राची भरारी, 60 पेक्षा जास्त उमेदवार बनले अधिकारी,वाचा संपूर्ण यादी )

स्मृती परतली आणि स्वप्न पुन्हा जागं झालं

जेव्हा आथिराला तिची ओळख पटली, तेव्हा तिने जिद्दीने आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती पुन्हा बेंगळुरूला गेली. तिथे तिच्या कुटुंबाने तिच्यासाठी एका केअरटेकरची व्यवस्था केली. पहिल्या 3 वर्षांत शिकलेले सर्व धडे ती विसरली होती, पण तरीही तिने पुन्हा शून्यातून सुरुवात केली आणि आपले बीडीएस पूर्ण केले. 

Advertisement

2020 मध्ये ती कोझिकोडमध्ये परतली आणि एका स्वयंसेवी संस्थेत दिव्यांग व्यक्तींसाठी काम करू लागली. कोरोनाच्या काळात काम करताना तिला दिव्यांग लोकांच्या समस्यांची जाणीव झाली आणि तिथूनच तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले.

बहिणीचा मोठा त्याग

आथिराच्या या यशात तिची धाकटी बहीण अनघा हिचा सिंहाचा वाटा आहे. अनघा त्यावेळी सायकॉलॉजीचे शिक्षण घेत होती, पण आपल्या मोठ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी तिने ते शिक्षण अर्धवट सोडले आणि बीएससी नर्सिंगला प्रवेश घेतला. जेणेकरून ती आथिराची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकेल. यूपीएससीच्या मुलाखतीत जेव्हा आथिराला विचारण्यात आले की तुझी सर्वोत्तम मैत्रीण कोण आहे, तेव्हा तिने अभिमानाने आपल्या बहिणीचे नाव घेतले.

Advertisement

स्वप्नांना विमानाचे पंख

आथिराने तिरुवनंतपुरममधील एका अकादमीतून ऑनलाइन शिक्षण घेतले आणि मल्याळम हा पर्यायी विषय निवडला. LIC एजंट असलेल्या तिच्या आई-वडिलांनी तिला प्रत्येक पावलावर साथ दिली.अथिराला आयएएस (IAS) अधिकारी बनायचे आहे. ती म्हणते की, जर या रँकवर तिला आयएएस मिळाले नाही, तर ती पुन्हा प्रयत्न करेल. व्हीलचेअरवर बसूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्णही करता येतात, हे आथिराने जगाला दाखवून दिले आहे.


 

Topics mentioned in this article