UPSC Recruitment 2026: केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच यूपीएससीने भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी अंतर्गत तब्बल 105 पदांसाठी थेट भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 27 जून 2026 पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत ऑनलाइन रिक्रूटमेंट ॲप्लिकेशन पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची ही मोठी संधी असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलाई 2026 अशी ठेवण्यात आली आहे.
कुठे मिळणार नोकरी?
यूपीएससीने काढलेल्या या थेट भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांना भारत सरकारच्या विविध प्रतिष्ठित मंत्रालयांमध्ये सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय म्हणजेच सिव्हिल एव्हिएशन, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा समावेश आहे. या सर्व मंत्रालयांमधील रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
( नक्की वाचा : सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 लाख पगार अन् मुंबईत राहण्याची जागा; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज, वाचा सर्व माहिती )
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत वेगवेगळ्या विभागांमधील अनेक प्रकारची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये जॉइंट डायरेक्टर, एरोनॉटिकल ऑफिसर, लीगल ऑफिसर, कंपनी प्रॉसिक्युटर, डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट, सिव्हिलियन असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, स्टोअर ऑफिसर आणि सीनियर फोटोग्राफिक ऑफिसर या पदांचा समावेश आहे. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी मेडिकल ऑफिसर किंवा रिसर्च ऑफिसर (सिद्धा) आणि ऑर्थोपेडिक्स, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी अशा विविध विभागांसाठी स्पेशालिस्ट ग्रेड III या पदांसाठी देखील अर्ज मागवण्यात आले आहेत.
इथे पाहा नोकरीचे संपूर्ण नोटीफिकेशन
कसा करणार ऑनलाईन अर्ज?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सर्वात आधी यूपीएससीच्या अधिकृत ओआरए पोर्टलला म्हणजेच upsconline.nic.in या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. होमपेजवर गेल्यानंतर उमेदवारांनी प्रथम आपले रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत.
ज्या पदांसाठी अर्ज शुल्क लागू आहे, त्यांनी ते ऑनलाईन भरून फॉर्म फायनल सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट काढून आपल्याकडे जपून ठेवावी.
'या' गोष्टींची घ्या विशेष खबरदारी?
यूपीएससीने या भरतीबाबत उमेदवारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. कोणत्याही पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर अधिसूचना म्हणजेच डिटेल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
यामुळे संबंधित पदासाठी लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर अटी व शर्ती उमेदवारांना स्पष्ट समजतील आणि अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.