What is Monsoon Blues : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पाहिलेले सुंदर डोंगर, चहाचे मळे, पावसाच्या सरी आणि ढगांनी वेढलेल्या दऱ्या डोळ्यांसमोर ठेवून एका तरुणीनं केरळची ट्रिप प्लॅन केली. कित्येक वर्षांपासूनचं हे स्वप्न पूर्ण होणार म्हणून ती अत्यंत आनंदी होती. केरळमध्ये पोहोचल्यानंतर सुरुवातीचे दोन-तीन दिवस निसर्गाचे ते अद्भूत रूप पाहून मन सुखावले. पण अचानक चौथ्या दिवसापासून सगळंच बदललं.
निसर्गाचं तेच सौंदर्य समोर असतानाही मनामध्ये अचानक अनामिक भीती, अस्वस्थता, आळस आणि प्रचंड उदासी दाटून आली. स्वप्नातल्या ठिकाणी येऊनही अचानक नैराश्याचा शिकार का व्हावं लागलं, या प्रश्नाने त्या तरुणाला चक्रावून सोडलं. अखेर गुगलवर शोध घेतल्यावर समोर आले की, हा कोणताही मानसिक आजार नसून बदलत्या हवामानामुळे होणारा मान्सून ब्लूज हा प्रकार आहे. पावसाळ्यात अनेकांच्या आनंदावर विरजण घालणारा हा आजार नेमका काय आहे, हे समजून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे.
हवामानातील बदल आणि मनावर होणारा परिणाम
वैद्यकीय भाषेत या समस्येला सिझनल अॅफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजेच सॅड (SAD) असे म्हटले जाते. अनेक लोकांवर हवामानाचा परिणाम केवळ शरीरावर नाही, तर थेट त्यांच्या मेंदूवर आणि भावनांवर होत असतो.
पावसाळ्यात सलग काही दिवस पडणारा पाऊस, आकाश सतत ढगाळ असणे, सूर्यप्रकाश न मिळणे आणि सतत घरात किंवा एकाच खोलीत बंद राहवे लागणे यामुळे माणसाच्या रोजच्या जीवनशैलीत मोठा बदल होतो.
यामुळे अचानक थकवा येणे, ऊर्जेची पातळी कमी होणे, सतत झोपून राहावेसे वाटणे, चिडचिड होणे आणि कोणत्याही कामात मन न लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. आवडत्या वातावरणात असूनही माणसाला आतून प्रचंड उदास वाटू लागते.
( नक्की वाचा : Emotional Eating म्हणजे काय? भूक नसतानाही महिला का खातात? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य )
सूर्याचा प्रकाश आणि शरीरातील केमिकल्सचे गणित
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य आणि मूड नियंत्रित करण्यात सूर्यप्रकाशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सूर्यप्रकाश आपल्या शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारख्या केमिकल्सचे संतुलन राखतो. ही केमिकल्स आपली झोप, मूड आणि सतर्कता यावर थेट परिणाम करतात.
जेव्हा पावसाळ्यात दीर्घकाळ पाऊस पडतो आणि धुके किंवा ढगांमुळे सूर्यप्रकाश मिळत नाही, तेव्हा या केमिकल्सचे संतुलन बिघडते. यामुळे शरीरात थकवा वाढतो आणि मन जड होते. यासोबतच हवेतील आर्द्रता आणि ऑक्सिजनच्या पातळीत होणारे बदलही शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

वातावरणातील नकारात्मकता वाढवते मानसिक ताण
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात केवळ ऊन न पडणे हेच या उदासीचे कारण नसते, तर अवतीभवतीचे वातावरणही यात मोठी भूमिका बजावते. पावसाच्या दिवसांत ठिकठिकाणी पाणी साचणे, चिखल, वाहतूक कोंडी आणि जलप्रदूषण यामुळे आरोग्याचे धोके वाढतात. बाहेर जाण्यावर मर्यादा आल्यामुळे माणसाचा सामाजिक संपर्क कमी होतो.
निसर्गाचे सौंदर्य अनुभवतानाच दुसरीकडे या सगळ्या त्रासामुळे मानवी मनावर नकळत एक प्रकारचा दबाव निर्माण होतो, जो मान्सून ब्लूज वाढवण्यास कारणीभूत ठरतो. ही कोणतीही मोठी गंभीर आजारी नसली तरी याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. जर ही निराशा दीर्घकाळ राहिली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
निराशा दूर करण्यासाठी आणि बचावासाठी सोपे उपाय
मान्सून ब्लूजच्या प्रभावातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी काही साध्या पण प्रभावी गोष्टींचा दिनक्रमात समावेश करणे फायदेशीर ठरते. पावसाळ्यातही आपल्या झोपण्याची आणि जेवण्याची एक निश्चित वेळ ठरवून घ्यावी. दिवसभरात जेव्हा कधी थोडा वेळ ऊन पडेल, तेव्हा नैसर्गिक प्रकाशात जास्तीत जास्त वेळ घालवावा. बाहेर जाता येत नसले तरी घराच्या आतच हलका व्यायाम किंवा योगासने करावीत. आपण राहत असलेली जागा कोरडी, स्वच्छ आणि हवेशीर राहील याची काळजी घ्यावी. मानसिक शांततेसाठी दररोज काही वेळ ध्यान करावे आणि कामाच्या धावपळीत स्वतःसाठी छोटे ब्रेक घेत राहावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world