What is Romance Scam : प्रेम ही एक सुंदर भावना आहे, पण तुमचे प्रेम जर डिजिटल असेल आणि तुम्ही ऑनलाइन प्रेमात असाल, तर सावध व्हा! यावर्षी रोमान्स स्कॅम (Romance Scams) आणि डीपफेकचं (Deepfakes) प्रमाण जगभर वाढत आहे.
सायबर सिक्युरिटी कंपनी मॅकएफीच्या ताज्या अहवालानुसार, 2025 पर्यंत जगभरातील ऑनलाइन स्कॅमपैकी 20% पेक्षा जास्त प्रकरणे रोमान्स स्कॅमशी संबंधित असतील. याचा फटका बहुतेक तरुणांना बसत आहे. त्यामुळे सर्व जगाची चिंता वाढवणारा रोमान्स स्कॅम काय आहे? त्यापासून कसा बचाव करणार? हे जाणून घेऊया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोमान्स स्कॅम म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ही एक प्रकारची ऑनलाइन फसवणूक आहे. यामध्ये स्कॅमर एखाद्याशी प्रेमाचे नाटक करतात. ते डेटिंग ॲप्स किंवा सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करून लोकांशी बोलणे सुरू करतात. हळूहळू भावनिक संबंध निर्माण करतात आणि नंतर पैशांची मागणी करू लागतात. तुम्ही पैसे पाठवताच ते गायब होतात.
( नक्की वाचा : 15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड? )
रोमान्स स्कॅमची प्रमुख वैशिष्ट्ये
ऑनलाइन स्कॅमवर सायबर फर्म मॅकएफीचा अहवालमध्ये रोमान्स स्कॅमची प्रमुख वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत.
- यावर्षी 20% पेक्षा जास्त ऑनलाईन स्कॅम रोमान्सशी संबंधित असतील.
- बळी पडणारे तरुण: अर्ध्याहून अधिक बळी 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे असू शकतात.
- युवा वर्ग जास्त सक्रिय: ऑनलाइन जगात जास्त सक्रिय असणारे तरुणच याचे बळी ठरत आहेत.
- एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर: स्कॅमर एआय (AI) आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
स्कॅमर डीपफेकचा आधार का घेत आहेत?
स्कॅमर एआयसोबत डीपफेकचाही वापर करत आहेत. डीपफेकचा वापर केल्यानंतर एखाद्या फोटो, व्हिडिओ किंवा आवाजात अशा प्रकारे बदल करते की खरे आणि खोटे यातील फरक करणे कठीण होते. याचा फायदा घेऊन स्कॅमर लोकांना फसवतात. अहवालानुसार, एआयमध्ये सुधारणा झाल्यामुळे डीपफेक इतके अचूक झाले आहेत की त्यांना विशेष सॉफ्टवेअरनेही ओळखणे देखील कठीण झाले आहे. स्कॅमर या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना सहज मूर्ख बनवत आहेत.
( नक्की वाचा : ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं )
तरुण का लक्ष्य ?
- ऑनलाईन स्कॅममध्ये तरुण का बळी पडत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे उत्तर त्यांच्या ऑनलाईन सवयींमध्ये आहे.
- तरुण लोक ऑनलाइन जास्त सक्रिय असतात.
- ते डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात.
- अनेकदा जास्त विचार न करता लगेच विश्वास ठेवतात.
रोमान्स स्कॅमपासून कसे वाचाल?
रोमान्स स्कॅमच्या जाळ्यात तुम्हाला फसवण्यासाठी स्कॅमर तयार आहेत, पण आता त्यापासून कसे वाचायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. यामधून वाचण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
ऑनलाईन माध्यमातून संपर्कात आलेल्या कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका.
सोशल मीडियावर प्रोफाइल खरी आहे की नकली, याची पडताळणी करा.
अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडिओ कॉलमध्ये सावध रहा.
अनोळखी व्यक्तीला कधीही पैसे पाठवू नका.
तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले आहे, पण त्यासोबत काही धोकेही आले आहेत. या धोक्यांपासून तुम्हाला वाचून राहायचे आहे, जेणेकरून तुम्ही स्कॅमरच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकाल.