चहामध्ये बिस्कीट बुडवून खाण्याची प्रथा कोणत्या शतकात सुरू झाली? रंजक आहे इतिहास...

चहाच्या कपासोबत एका ताटात बिस्कीट, फरसाण किंवा इतर पदार्थ देण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, पूर्वी लोक फक्त चहा प्यायचे आणि त्यासोबत दुसरं काहीही खात नव्हते.

जाहिरात
Read Time: 3 mins
( Unsplash Image)

Tea and Biscuits : चहा पिण्यासाठी चहाप्रेमी काळ-वेळ पाहत नाहीत. अगदी कडक उन्हातून घरी आल्यानंतरही ते गरमागरम चहा पिण्यास तयार असतात. भारतात चहा केवळ एक पेय नाही तर लोकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. तर काही जण बेड-टी घेणं पसंत करतात. नाश्त्यादरम्यान चहाचा कप असो किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतरचा चहा, पावसाळ्यात तर चहाची मजा काही औरच असते.

मात्र असे अनेक लोक आहेत, ज्यांना चहा प्यायला अजिबात आवडत नाही. मात्र त्यांना चहामध्ये ब्रेड, बिस्कीट बुडवून खायला आवडतं. चहाच्या कपासोबत एका ताटात बिस्कीट, फरसाण किंवा इतर पदार्थ देण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, पूर्वी लोक फक्त चहा प्यायचे आणि त्यासोबत दुसरं काहीही खात नव्हते. पण हळूहळू लोकांना चहाबरोबर स्नॅक्स आणि नंतर बिस्किटं आवडू लागली. ही सवय कशी सुरू झाली असेल, असा विचार तुम्ही कधी केला आहे का?

Advertisement

चहामध्ये पहिलं बिस्कीट कधी बुडवलं...

चहामध्ये बिस्कीट बुडवून खाण्याची परंपरा खूप वर्षे जुनी आहे. इतिहारतज्ज्ञांनुसार, याची सुरुवात युरोपमध्ये झाली. १७ आणि १८ व्या शतकात बिस्कीट आणि ब्रेड खाल्ले जात होते. मात्र ते प्रचंड कडक असत. ज्यामुळे खाणं कठीण होत असे. अशावेळी ब्रेड किंवा बिस्कीट नरम करण्यासाठी चहा, कॉफी किंवा दुधात बुडवून खाण्याची प्रथा पडली.

एक सुविधा म्हणून अशा पद्धतीने खाण्याची सुरुवात झाली. मात्र येणाऱ्या काळात हा एक ट्रेंड झाला. ब्रिटेनमध्ये जेव्हा टी टाइम संस्कृती वाढली तेव्हा केवळ चहा देण्याची पद्धत संपली. चहासोबत बिस्कीट देण्याची प्रथा सुरुवात झाली. ब्रिटनमधून ही प्रथा इतर शहरांमध्ये आणि देशांमध्ये पसरली आणि लवकरच ती भारतात पोहोचली व लोकप्रिय झाली. ब्रिटिश काळात भारतात चहा पिण्याची प्रथा झपाट्याने पसरली आणि त्यात बिस्किटे बुडवून खाण्याची सवयही रूढ झाली.

चवीमागेच खरा आनंद...

खरं तर, चहामध्ये बिस्किटे बुडवून खाणं हे केवळ याच्या चवीमुळेच लोकप्रिय झालेलं नाही. त्यामागे एक शास्त्रदेखील आहे. जर तुम्ही कधी चहामध्ये बिस्कीटं बुडवून खाल्लं असेल तर तुम्हाला ती सामान्य बिस्किटांपेक्षा अधिक चविष्ट वाटतील. जेव्हा बिस्कीट चहामध्ये बुडवलं जातं तेव्हा ते मऊ होतं आणि चहाचा स्वाद त्याची चव अधिकच वाढवतो. अनेकांचा असा विश्वास आहे की यामुळे चहा आणि बिस्कीटं या दोन्हींची चव वाढते. म्हणूनच आजही लोक पार्ले-जी, मारी, ग्लुकोज किंवा इतर कोणतेही खारट बिस्कीटं चहामध्ये बुडवून खाणं पसंत करतात. आज जरी कॉफी संस्कृती लोकप्रिय झाली असली आणि त्यासोबत विविध प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध असले, तरीही चहा आणि बिस्कीटं खाण्याचा आनंद आजही लोकांच्या मनात आपलं स्थान टिकवून आहे.

(वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV मराठी याचा दावा करीत नाही.)