Lakshmi Puja 2025 Date And Time: हिंदूधर्मामध्ये दिव्यांचा सण 'दीपावली' अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. आश्विन वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी, आश्विन वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी, अमावास्या तिथीस लक्ष्मीपूजन आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथीस बलीप्रतिपदा, कार्तिक महिन्याच्या द्वितीया तिथीला भाऊबीज, अशा पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीतील लक्ष्मी पूजनास विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी घराघरांमध्ये धनाची देवता लक्ष्मीमाता, कुबेर देवता, गणपती बाप्पाचीही विधीवत पूजा केली जाते. पण यंदा लक्ष्मीपूजन 20 ऑक्टोबर की 21 ऑक्टोबर रोजी आहे, यावरुन नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती, या प्रश्नामुळे लोक संभ्रमात आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
20 की 21 ऑक्टोबर, लक्ष्मीपूजन कधी आहे? | When Is Lakshmi Puja 2025
अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी समाप्त होणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे.
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त | Lakshmi Puja Shubh Muhurat
तज्ज्ञांच्या मते, 21 ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर जवळपास अडीच तासांमध्ये लक्ष्मीपूजन करू शकता.
ज्योतिषशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेदरम्यान करू शकता.
देशपांडे पंचांग काय सांगते?
जी मंडळी देशपांडे पंचांग फॉलो करतात त्यांच्यासाठी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी सोशल मीडियावर लक्ष्मीपूजनाबाबत पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "दिवाळीतील लक्ष्मीपूजन कधी करावे याविषयी धर्मशास्त्रीय निर्णय देत आहोत. निर्णयसिंधूत 'दण्डैकरजनीयोगे दर्शः स्यात्तु परेऽहनि । तदा विहाय पूर्वेद्युः परेऽन्हि सुखरात्रिका ।।' अर्थात जेव्हा दोन दिवस अमावास्या प्रदोषकाळात विद्यमान असेल तेव्हा सूर्यास्तानंतर 1 दंड म्हणजे 1 घटिका अर्थात् 24 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त अमावास्या असल्यास त्याच दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे आणि सूर्यास्तानंतर 24 मिनिटांपेक्षा कमी अमावास्या असल्यास आदल्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असा अर्थ होतो. पुरुषार्थचिंतामणी ग्रंथात दिलेले मत हे त्यांचे स्वतंत्र मत असून त्यास इतर कोणत्याही धर्मशास्त्रग्रंथांनी विचारात घेतलेले नाही. त्यामुळे वरील निर्णयसिंधू व धर्मसिंधू या ग्रंथातील वचनांनुसार कोणत्या प्रदेशात कर्धी लक्ष्मीपूजन करावे ते देत आहोत.
20 ऑक्टोबर 2025 या तारखेस लक्ष्मीपूजन असलेली ठिकाणे- संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेशातील काही भाग, तामिळनाडू इत्यादी
21 ऑक्टोबर 2025 या तारखेस लक्ष्मीपूजन असलेली ठिकाणे- गोरखपूर, प्रयागराज, संपूर्ण बिहार, ओरिसा, बंगाल इत्यादी
महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजन कधी करावे?
महाराष्ट्रातील संपूर्ण 36 राज्यांमध्ये 20 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत ठरेल, अशीही माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी दिलीय.
- उत्तर आणि पूर्व भारतातील काही प्रदेशांमध्ये 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त येत आहे.
- मध्य आणि पूर्व युरोपाचा त्यामध्ये दुबई अबुधाबीपासून संपूर्ण युरोपमध्ये 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन कारावे.
- संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामध्येही 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करावे.
- आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रांतामध्ये 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करावे.
- पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्या स्थानिक वेळेच्या सूर्यास्तापासून पुढील अडीच तासाचा जो कालावधी आहे, ज्यास प्रदोषकाळ म्हणतात, त्यावेळेस लक्ष्मीपूजन करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)