Raksha Bandhan 2025 Date, Time and Muhurat: सनातन परंपरेत श्रावण महिन्यातील पौर्णिमेला खूप महत्त्व आहे, कारण याच दिवशी बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि माझे जन्मोजन्मी रक्षण कर अशी प्रार्थना करते. आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही ती करत असते. तर भाऊ देखील आपल्या बहिणीला कोणताही त्रास होऊ नये, तिला सगळ्या सुख,सोई आयुष्यभर प्राप्त व्हाव्यात अशी प्रार्थना करतो आणि तिला छानशी भेट देतो. किंवा रक्षासूत्र बांधतात, ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. मात्र एखाद्याला भाऊ किंवा बहीण नसेल तर त्यांनी या दिवशी काय करावे असा अनेकदा प्रश्न निर्माण होतो. याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
( नक्की वाचा: 'लाडकी बहीण'चा हफ्ता रक्षाबंधनापूर्वी खात्यात जमा होणार )
रक्षाबंधनाला तयार होतोय छान योग
स्वामी इंदुभवानंद तीर्थ महाराज यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, या वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल चतुर्दशी 8 ऑगस्ट 2025 रोजी आहे. या दिवशी दुपारी 1:42 वाजता पौर्णिमा सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 9 ऑगस्ट 2025, शनिवारी दुपारी 1:24 पर्यंत असेल. त्याचप्रमाणे श्रवण नक्षत्र 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:07 वाजता सुरू होऊन 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:30 पर्यंत राहील. यामुळे या वर्षी श्रावण पौर्णिमा आणि श्रवण नक्षत्र एकाच वेळी येत असल्यामुळे एक चांगला योग तयार होत आहे. यंदाचे रक्षाबंधन भद्रा रहित असणार आहे.
( नक्की वाचा: रक्षाबंधनाला 95 वर्षानंतर जुळून आलाय अनोखा योग )
बहीण नसल्यास कोणाला राखी बांधावी?
स्वामी इंदुभवानंद तीर्थ महाराज यांच्या मते, रक्षाबंधनचा अर्थ ज्याच्याबद्दल तुमच्या मनात ज्याच्याकडून तुम्हाला संरक्षण मिळावे असे वाटते, त्याला तुम्ही राखी बांधू शकता. शास्त्रांनुसार, जी व्यक्ती रक्षण करण्यात सक्षम असते तो आपलेही रक्षण करू शकतो. जर तुम्हाला कोणी भाऊ नसेल, तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाला राखी बांधू शकता. आपल्याकडे सर्वात पहिली राखी आपल्या कुलदेवतेला अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णालाही महिला राखी बांधू शकतात. देवाशिवाय तुम्ही तुमच्या गुरू किंवा शिक्षकांनाही राखी बांधू शकता. कारण गुरू तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून योग्य मार्ग दाखवतो.
जर तुम्हाला भाऊ नसेल, तर रक्षाबंधनाला तुम्ही देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही राखी पाठवू शकता. हे सैनिक एक-दोन नागरिकांचे नाही तर या देशातील प्रत्येक नागरिकांचे रक्षण करत असतात. त्यामुळे ते देखील बंधूस्थानी मानले जाऊ शकतात. याशिवाय तुम्ही झाडालाही राखी बांधू शकता. भाऊ नसल्यास, महिला पिंपळ, वड, शमी, तुळस, बेल, केळी यांसारख्या झाडांना राखी बांधून सुख आणि समृद्धीची कामना करू शकता.
भाऊ नसल्यास कोणाकडून राखी बांधून घ्यावी?
ज्या लोकांना बहीण नसते, त्यांच्यासाठीही शास्त्रांमध्ये उपाय सांगितला आहे. जर तुमची बहीण नसेल, तर तुम्ही तुमच्या गुरू किंवा कोणत्याही मंदिरातील पुजाऱ्याकडून 'ॐ येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल' या मंत्राचा उच्चार करत राखी बांधून घेऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)