World Heart Day 2025: प्रचंड स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनामध्ये बहुतांश लोकांचे आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असते. धक्कादायक बाब म्हणजे लोक हृदयाशी संबंधित समस्याकडेही गांभीर्याने पाहत नाहीयेत. बदलत्या जीवनशैलीनुसार तरुण मंडळी हृदयविकारांना मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आलंय. छातीमध्ये दुखणे, दम लागणे किंवा छातीमध्ये धडधडणे यासारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे हृदयविकारांच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी मदत मिळू शकते. निरोगी असणाऱ्या तरुणांनीही हृदयाच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हृदयाचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी वेळोवेळी हृदयाच्या आरोग्याशी संबंधित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. जागतिक हृदय दिनानिमित्त (World Heart Day 2025) या लेखाद्वारे महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया...
तरुणांनो हृदयविकारांकडे दुर्लक्ष करताय? सावध व्हा...
हृदयविकार आता केवळ वयोवृद्ध, प्रौढ व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर तरुणांमध्येही जास्त प्रमाणात हृदयाशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचे दिसतंय. उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके अनियमित असणे, वृद्ध प्रौढांपुरता मर्यादित नसून तरुणांनाही उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होणे (Coronary Artery Disease, CAD) यासह अन्य विकारांचाही सामना करावा लागतोय.
हृदयविकारांमागील कारणे (Heart Disease Reasons)
बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, लॅपटॉप-मोबाइलचा जास्त वापर करणे, धूम्रपान, मद्यपान आणि अपुरी झोप या गोष्टी हृदयविकार होण्यास कारणीभूत ठरतात. छातीमध्ये होणाऱ्या सौम्य स्वरुपातील वेदना, थकवा किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणे यासारख्या लक्षणांकडे तरुण मंडळी दुर्लक्ष करतात. मानसिक ताण किंवा जास्त काम केल्याने असा त्रास होत असावा, अशी स्वतःचीच समजूत काढून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वैद्यकीय मदत घेण्यास उशीर झाल्यास हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, दीर्घकालीन हृदय तसेच रक्तवाहिन्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(नक्की वाचा: Heart Health Tips: आयुष्यातील हा दाब तुमचे हृदय पाडेल पूर्णपणे बंद, हृदयाची धडधड सुरू ठेवण्यासाठी घ्या ही काळजी)
हृदयाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरमधील सल्लागार कार्डिक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले की, जवळपास 50 टक्के तरुण मंडळी त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक नसतात. दुर्दैवाने 27 ते 45 वयोगटातील 10 पैकी पाच व्यक्ती निरोगी असतात तसेच त्यांच्या आहार आणि आरोग्याबाबत जागरूक असतात. पण ते हृदयविकाराच्या प्रमुख लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. छातीत दुखणे, छातीत धडधडणे, दम लागणे किंवा असामान्य थकवा येणे अशा कित्येक समस्या किरकोळ असल्याचे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण याच लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यामध्ये गंभीर हृदयरोगांचे निदान होऊ शकते. छोट्या-छोट्या समस्यांवर वेळीच उपाय केले जाऊ शकतात. हृदयाच्या आरोग्याबाबत योग्य शिक्षण, जागरूकता आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत.
हृदयाची अशी घ्या काळजी
डॉ. भामरे यांनी पुढे असंही सांगितलं की, प्रत्येकाने हृदयाशी संबंधित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये कोलेस्टेरॉल, रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजी यासारख्या टेस्ट कराव्या. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये पौष्टिक आहाराचे सेवन, नियमित व्यायाम करावा, धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळावे, तणावाचे व्यवस्थापन करावे आणि पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. कोणत्याही समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच निदान झाल्यास आरोग्याच्या गंभीर समस्यांचा धोका टळू शकतो आणि हृदयाचे आरोग्यही सुधारेल.
डॉ. स्वरूप स्वराज पाल (मुख्य सीव्हीटीएस सर्जन ग्लेनईगल्स हॉस्पिटल,परळ मुंबई) यांनीही सांगितले की, 40 टक्के तरुण त्यांच्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. 27-45 वयोगटातील 10 पैकी चार लोक छातीत दुखणे किंवा छातीत धडधडणे यासारखी लक्षणे वेळीच ओळखू शकत नाहीत, कारण हृदयाशी संबंधित समस्या केवळ वृद्धांनाचा होऊ शकतात; असा त्यांचा समज असतो. ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे लहान वयातच हृदयरोगांचे प्रमाण वाढत आहे.
प्रत्येकाने आपल्या हृदयाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे न चुकता हृदयाशी संबंधित तपासणी करा, पौष्टिक आहाराचे सेवन करावे. शरीरामध्ये कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांची तातडीने मदत घ्यावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)