गाडी चालवायला शिकणाऱ्या व्यक्तीने 10 वर्षांच्या मुलाला चिरडले. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत समर्थ शिंदे या बालकाचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. समर्थ हा सायकल चालवत असताना त्याला या गाडीने चिरडले आहे. मंगळवारी संध्याकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील मासळी बाजाराच्या आवारात समर्थ सायकल चालवत होता. त्याच परिसरात एकजण गाडी चालवायला शिकत होता. कारचालक गाडी वळवत असताना समर्थची सायकल कारच्या बाजूला आली होती. कारच्या धडकेने आधी समर्थ पडला आणि नंतर त्याच्या अंगावरून सायकल केली.
सीसीटीव्हीच्या दृश्यांमध्ये दिसून आले आहे की समर्थ जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या अंगावरून कारचे पुढचे आणि मागचे दोन्ही चाक गेले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या समर्थचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या समर्थला पहिले स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती फारच गंभीर असल्याने त्याला हडपसरच्या रुग्णालयात नेण्यात आले. बुधवारी अखेर त्याचा मृत्यू झाला.
गुन्हा नोंदवण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल पोलिसांचे अजब उत्तर
घटना घडल्यानंतर बराच काळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नव्हता. भिगवण मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांकडून अजब उत्तर देण्यात आले. समर्थच्या मृत्यूमुळे भिगवणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.