शरद सातपुते, सांगली
शिराळा तालुक्यातील बिऊर येथे गुरुवारी संध्याकाळी बिबट्याने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. आपल्या घराच्या अंगणात मित्रांसोबत खेळत असलेल्या राजवीर पाटील (4 वर्षे) या चिमुरड्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेनंतर बिऊर आणि शिराळा परिसरात जनक्षोभ उसळला आहे. संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेली माहिती अशी की, राजवीर आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने राजवीरला जबड्यात पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोबत असलेल्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने राजवीरला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला 'मृत' घोषित केले.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: मंचावर आले, दोनच वाक्य बोलले; अजितदादांना श्रद्धांजली वाहताना महेश लांडगे भावुक)
वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला
राजवीरच्या मृत्यूची बातमी कळताच ग्रामस्थांचा संयम सुटला. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असतानाही वनविभागाने ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप करत संतप्त जमावाने शिराळ्यातील वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला केला.
जमावाने कार्यालयातील खिडक्यांच्या काचा, फर्निचर आणि साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. रात्री उशीरापर्यंत ग्रामीण रुग्णालयाबाहेर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत आणि मृत मुलाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.