बनावट जन्म दाखल्याचे वाटप होत असल्याची प्रकरणे राज्यात अनेक ठिकाणी घडली आहेत. त्यात आता चक्क माजी मुख्यमंत्र्याच्या मतदार संघातच एक नाही तर तब्बल 82 बनावट जन्म दाखल्याचं वाटप झाल्याचे उघड झाले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील अर्धापूर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून एक दोन नव्हे तर चक्क 82 जन्म प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता या प्रकरणात अर्धापूर पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 82 पैकी 90 टक्के प्रमाणपत्र एकाच समुदायाच्या लोकांना देण्यात आल्याचे ही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यामागे देशविघातक शक्तींचा काही संबंध आहे का? याचा संशय वाढलाय आहे. पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे खान उझमा यांनी पासपोर्ट मिळावा यासाठी अर्ज केला होता. पण खान उझमा यांच्या जन्म प्रमानपत्रावर संशय आल्याने पासपोर्ट कार्यालय मुंबई यांनी त्याची सत्यता तपासण्याबाबत अर्धापूर नगर पंचायातीकडे पत्राद्वारे विचारणा केली होती.
त्यानंतर जन्म प्रमाणपत्रावर अर्धापूर नगर पंचायतीचा बनावट सही शिक्का मारण्यात आल्याचे उघड झाले. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचा आय डी वापरून त्यावरून जन्म प्रमाणपत्र काढून त्यावर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही आणि शिक्का मारण्यात आला होता. सही शिक्का खोटा असल्याचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी पासपोर्ट कार्यालयाला कळवले. त्यानंतर आरोग्य विभागाने चौकशी केली असता तब्बल 82 बनावट जन्म प्रमाणपत्र अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आल्याचे समोर आले. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाची सुरुवातच जानेवारी 2022 ला झालेली असताना कित्येक वर्षाआधीचे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
ज्यांचा जन्म या रुग्णालयात झाला आहे, केवळ त्यांनाच जन्मप्रमपत्र देण्याचे अधिकारी आहेत. पण ओटीपीचा गैरवापर करून कंत्राटी कर्मचारी एतेशामोद्दीन याने हे बनावट जन्म दाखले दिल्याचा ठपका आरोग्य विभागाने ठेवला आहे. ऑगस्ट 2024 पासून हे जन्म दाखले देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून एतेशामोद्दीन आणि इतरांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धापूर सिमी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनाचे सक्रिय केंद्र होते. या 82 लोकांनी बनावट जन्म प्रमाणापत्र का काढले? त्यांचा उद्देश काय? अवैध्य मार्गाने भारतात आलेल्या बांगलादेशीचा यात समावेश आहे का? सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत.