जाहिरात

Akola News: उंचीच्या आकड्यांना प्रेमाची चपराक! अकोल्यात पार पडलं असं लग्न, ज्याची गोष्ट ऐकून डोळ्यात येईल पाणी

Akola News : प्रेमाच्या या प्रवासात उंची किंवा शारीरिक मोजमापं कधीच अडसर ठरू शकत नाहीत, याचा प्रत्यय देणारं गोड उदाहरण अकोल्यात घडलं आहे.

Akola News: उंचीच्या आकड्यांना प्रेमाची चपराक! अकोल्यात पार पडलं असं लग्न, ज्याची गोष्ट ऐकून डोळ्यात येईल पाणी
Akola News : या खास लग्नाची सध्या अकोल्यात चर्चा आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : नशिबाचे खेळ आणि दैवाचे फासे कधी आणि कुठे पडतील हे सांगता येत नाही, पण जेव्हा दोन मनं जुळतात तेव्हा जगातील सर्व अडथळे फिके पडू लागतात. प्रेमाच्या या प्रवासात उंची किंवा शारीरिक मोजमापं कधीच अडसर ठरू शकत नाहीत, याचा प्रत्यय देणारी एक गोड कहाणी सध्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमारेषा ओलांडून अकोल्याच्या मातीत बहरली आहे. 

अकोल्याचा प्रतीक आणि मध्यप्रदेशची रेणुका यांनी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली असून, त्यांच्या या अनोख्या विवाहाने सध्या सर्वत्र कौतुकाची थाप मिळवली आहे. ही केवळ दोन व्यक्तींची गाठ नाही, तर दोन राज्यांच्या संस्कृतीचा आणि रेशीमगाठींचा एक सुंदर मिलाफ ठरला आहे.

उंची कमी तरी स्वप्ने मोठी

मध्यप्रदेशमधील सिरोंज गावातील नयापुरा भागात राहणारी रेणुका नामदेव हिच्यासाठी तिच्या घरचे गेल्या काही काळापासून योग्य जोडीदाराचा शोध घेत होते. रेणुकाचे शिक्षण एम.ए. पर्यंत झाले असून ती उच्चशिक्षित आहे, मात्र तिची उंची केवळ 3 फूट 8 इंच असल्याने तिला अनुरूप जोडीदार मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या.

( नक्की वाचा : IAS Officer: आधीच्या दोन्ही पत्नी IAS आणि आता तिसरीही...; 'या' बड्या सनदी अधिकाऱ्याच्या लग्नाची तुफान चर्चा )

दुसरीकडे, महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी असलेला प्रतीक धानुका हा देखील आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची वाट पाहत होता. प्रतीकची उंची 4 फूट 2 इंच असून तो सध्या पुण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. दोघांच्याही आयुष्यात उंचीचा अडसर येत असला, तरी त्यांच्या मनातील जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा मात्र खूप स्पष्ट होत्या.

कशी झाली भेट?

जेव्हा प्रत्यक्ष भेटीगाठीतून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, तेव्हा या दोघांनीही आधुनिक जगाचा आधार घेण्याचे ठरवले. प्रतीक आणि रेणुका यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर हळूहळू विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. दोघांचे स्वभाव आणि एकमेकांप्रती असलेला आदर यामुळे त्यांचे मनं एकमेकांत गुंतत गेली. 

शारीरिक उंचीपेक्षा विचारांची उंची महत्त्वाची असते, हे या दोघांनी एकमेकांना ओळखल्यावर पटले. घरच्यांनीही मुलांची पसंती लक्षात घेऊन मोठ्या आनंदाने या नात्याला हिरवा कंदील दिला आणि या दोन राज्यांमधील दोन कुटुंबं एका नात्यात गुंफली गेली.

( नक्की वाचा : Doctor Death: मृत्यूपूर्वी घेतलेली एक सही आणि 60 कोटींचा बंगला; हायप्रोफाईल डॉक्टरच्या मृत्यूचे गूढ वाढले )

अकोल्यात पार पडला शाही सोहळा

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. या अनोख्या जोडीला पाहण्यासाठी आणि त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळत होतं. 

3 फूट 8 इंच उंचीची रेणुका आणि 4 फूट 2 इंच उंचीचा प्रतीक जेव्हा स्टेजवर उभे राहिले, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.केवळ बाह्य रूपावरून माणसाची पारख करणाऱ्या समाजासाठी ही जोडी एक उदाहरण आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com