Riteish Deshmukh On Ravindra Chavan Statement: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले आहे. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं ते म्हणाले. रविंद्र चव्हाण यांच्या या विधानाचा जोरदार निषेध केला जात आहे. अशातच विलासराव देशमुख यांचे सुपुत्र, अभिनेता रितेश देशमुख याने रविंद्र चव्हाण यांच्या या विधानाला सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाला रितेश देशमुख?
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी रविंद्र चव्हाण हे लातूरमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केले. यावर आता अभिनेता रितेश देशमुखने खणखणीत उत्तर दिले आहे. "दोन्ही हात वर करुन सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेली असतात. लिहलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, जय महाराष्ट्र!" असं रितेश देशमुखने म्हटलं आहे. रितेश देशमुखच्या या व्हिडिओवर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैव आहे. लातूरची ही संस्कृती नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होत आहे, असं ते म्हणाले. दुसरीकडे विलासराव देशमुख हे लातूरची अस्मिता आहेत. उचलली जीभ आणि लावली टाळला” असे वक्तव्य रविंद्र चव्हाण करत आहेत. त्यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी लातूर काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
भाजपची प्रतिक्रिया...
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा स्वभाव मुळातच कुणाविषयी द्वेष बाळगणारा नाही. भारतीय जनता पक्षाने नेहमीच राजकीय मतभेद बाजूला ठेवून विरोधकांच्या योगदानाचाही सन्मान व योग्य ते कौतुक केले आहे, हे महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे. काँग्रेस पक्ष सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांच्या वक्तव्याचा पराचा कावळा करून अनावश्यक गाजावाजा करत आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने आणि जनतेचा पाठिंबा कमी होत चालल्याने केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हा मुद्दा उकरून काढला जात आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
Raj Kundra: राज कुंद्रा पु्न्हा अडचणीत; 150 कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्यात कोर्टाचे समन्स