प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या 'बिटकॉइन पॉन्झी स्कॅम' (Bitcoin Ponzi Scam) प्रकरणात मुंबईतील एका विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयाने राज कुंद्रा यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.
19 जानेवारीला न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश
न्यायालयाने केवळ राज कुंद्राच नव्हे, तर दुबईस्थित व्यापारी राजेश सतीजा यांनाही समन्स पाठवले आहे. या दोघांनाही 19 जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ईडीने या दोघांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये त्यांना आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले होते.
काय आहे 285 बिटकॉइन्सचे कनेक्शन?
ईडीच्या तपासानुसार, राज कुंद्रा यांनी 'गॅन बिटकॉइन' (Gain Bitcoin) पॉन्झी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अमित भारद्वाज याच्याकडून 285 बिटकॉइन्स मिळवले होते. हे बिटकॉइन्स युक्रेनमध्ये 'बिटकॉइन मायनिंग फार्म' स्थापन करण्यासाठी देण्यात आले होते. मात्र, हा प्रकल्प कधीच प्रत्यक्षात आला नाही.
( नक्की वाचा : Sunil Shetty : सुनील शेट्टीनं 40 कोटींची ऑफर का नाकारली? कारण वाचून 'अण्णा'बद्दलचा आदर 10 पटीनं वाढेल )
आजच्या घडीला या 285 बिटकॉइन्सची किंमत 150 कोटी रुपयांहून अधिक आहे. ईडीचा असा दावा आहे की, हे बिटकॉइन्स अजूनही राज कुंद्रा यांच्या ताब्यात आहेत आणि ते 'गुन्ह्यातील कमाई' मानले जात आहेत.
मध्यस्थ असल्याचा दावा ईडीने फेटाळला
राज कुंद्रा यांनी तपासादरम्यान असा दावा केला होता की, त्यांनी या व्यवहारात केवळ एक 'मध्यस्थ' म्हणून काम केले होते. मात्र, ईडीने हा दावा फेटाळून लावला आहे. आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, कुंद्रा यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. उलट, कुंद्रा आणि महेंद्र भारद्वाज (अमित भारद्वाजचे वडील) यांच्यात 'टर्म शीट' नावाचा करार झाला होता, जो ते या व्यवहाराचे लाभार्थी असल्याचे सिद्ध करतो.
पुराव्यांची लपवाछपवी आणि 'आयफोन'चे कारण
तपास यंत्रणेने असेही म्हटले आहे की, 2018 पासून अनेक संधी देऊनही राज कुंद्रा यांनी ज्या 'वॉलेट'मध्ये बिटकॉइन्स ट्रान्सफर झाले होते, त्याचा पत्ता दिलेला नाही. कुंद्रा यांनी असा दावा केला आहे की, त्यांचा 'iPhone X' खराब झाल्यामुळे त्यातील सर्व महत्त्वाची माहिती गहाळ झाली आहे. ईडीच्या मते, हा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा आणि गुन्ह्याची व्याप्ती लपवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आता न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरू राहणार असून 19 जानेवारीची सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world