नवाब मलिक यांची कन्या महायुतीकडून अणुशक्ती नगर विधानसभा (Assembly Election 2024) क्षेत्रात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर महाविकास आघाडीकडून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी फहाद अहमद हे शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण येथे आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी पक्की केली आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते. मात्र आता ते स्वतः महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहे. फहाद अहमद पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
महायुतीकडून सना मलिक रिंगणात उतरल्या असून त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने तिकीट दिलं आहे, असं असलं तरी भाजपकडून सना मलिक यांचे वडील नवाब मलिक यांच्यावर नाराज आहेत. तर महाविकास आघाडीने तिकीट दिलेले फहाद अहमद सुरुवातीपासून चळवळीत सक्रीय आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे तुकाराम काटे निवडून आले होते. यावेळी ते नवाब मलिक यांच्यासमोर लढले होते. या निवडणुकीत नवाब मलिक यांचा पराभव झाला होता. तुकाराम काटे यांना 39,966 मतं पडली होती, तर नवाब मलिक यांना 38,969 मते पडली होती.
नक्की वाचा - Assembly Election : महायुती आणि महाविकास आघाडीकडून किती जागा जाहीर? अद्याप किती जागांवर तिढा?
2019 ला मात्र नवाब मलिक यांनी शिवसेनेच्या काटेंचा पराभव केला आणि आपला अणुशक्ती नगरचा गड राखला. 65 हजार 217 मतं पडली. तर यावेळी शिवसेनेच्या काटेंना 52 हजार 466 मतं पडली. आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजपला नवाब मलिक पक्षात नको आहेत. मात्र अजित पवार हे नवाब मलिक यांच्यासाठी आग्रही दिसत आहेत. त्यामुळे आता सुरुवातीला नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्ती नगरचे तिकीट दिले आहे. मात्र यामुळे नवाब मलिक यांच्यावर नाराज असलेला भाजप त्यांची मुलगी सना मलिक यांना मदत करणार की नवाब मालिकांवर असलेल्या नाराजीचा फटका सना मलिक यांना बसणार हे बघणे महत्त्वाचे आहे. खरं तर अणुशक्ती नगर हा भाग मुस्लीम बहुल आहे. मात्र लोकसभेत या गोष्टीचा फायदा झालेल्या महाविकास आघाडीला या गोष्टीचा फारसा फरक पडेल का हे बघणे महत्वाचे आहे.