मुंबई: विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणुकानंतर आता माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल होणार असल्याच्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर अर्जांची छाननी होणार असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाल्यात अदिती तटकरे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती, असं अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. यासंबंधींचे त्यांचे ट्वीटही सध्या व्हायरल होत आहे.
नक्की वाचा: शरद पवार- अजित पवारांची दिल्लीत भेट! काय झाली चर्चा? दादा म्हणाले....
प्रसिद्धीपत्रकात काय म्हटले?
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडुन रील्स, व्हीडीओव्दारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असुन याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे सध्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडुन आपणास कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये या करिता आपण आपलेस्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सदयस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणुन दयावी.
नक्की वाचा - बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं; कुर्ला डेपोजवळच सुरू झालं होतं अपघाताचं सत्र?