सुनिल दवंगे, अहिल्यानगर:
Ahilyanagar News: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहाता तालुक्यातील गर्भलिंग तपासणीचे मोबाईल नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. रात्रीच्या अंधारात हा सर्व पापाचा खेळ सुरु होता. निर्जनस्थळी सुरु असलेल्या या गर्भलिंग तपासणीचा भंडाफोड केला असून डॉक्टरसह एजंट जाळ्यात अडकला आहे. तर तपासणीसाठी आलेल्या आठ गर्भवती महिला देखील सुरक्षित ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
अहिल्यानगरमध्ये गर्भलिंग तपासणीचा भांडाफोड
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात निर्जन ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचा पोलिसांनी धाडसी कारवाईत भंडाफोड केला आहे. या कारवाईत एका डॉक्टरसह एजंटला ताब्यात घेण्यात आलं असून बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या गर्भवती महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळावरून सोनोग्राफीसह विविध वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आलं असून, यात तपासणी झाल्यानंतर गर्भपात करणार मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लोणी–निर्मळ पिंपरी रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला शेतातील दोन खोल्यांमध्ये, वाहनातून साहित्य आणून हा प्रकार सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर विशेष पथकाने गुप्त छापा टाकत ही कारवाई केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात अल्ट्रासाऊंड मशीन, मॉनिटर, बॅटरी वीज यंत्रणा, जेल, कागदपत्रे तसेच तीन वाहने जप्त करण्यात आली असून, ही संपूर्ण यंत्रणा मोबाईल पद्धतीने उभारण्यात आली होती.