
संजय तिवारी, प्रतिनिधी
जंगलात लागलेल्या आगीमुळे किती नुकसान होऊ शकतं, याचं ताजं उदाहरण म्हणजे अमेरिकेतील कॅलिफॉर्निया. येथील 8000 एकर भाग अक्षरश: जळून खाक झाला आहे. याशिवाय लाखो नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान जंगलात नेमकी कुठे आग लागली याबाबत अचून माहिती देणारी यंत्रणा महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Tiger Reserve) लावण्यात आली आहे. या नव्या यंत्रणेमुळे मोठं नुकसान टाळलं जाऊ शकतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जंगलात आग लागली तर ती नेमकी कुठे लागली हे सांगणारी यंत्रणा महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात लावण्यात आली आहे. देशभरातील जंगलातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पहिली फायर डिटेक्शन अँड वार्निंग सिस्टम, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात एका उंच टेकडीवर एक टॉवर उभारून त्यावर स्थापित करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ही यंत्रणा आग कुठे आणि कधी लागण्याची शक्यता आहे ते वर्तविण्यासाठी देखील परिणामकारक आहे.
नक्की वाचा - Nagpur News : आता दुचाकीमध्ये ठेवता येणार दोघांचे हेल्मेट, नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांची निर्मिती
पेंच व्याघ्र प्रकल्पातील घनदाट जंगलातील एका उंच टेकडीवर लावण्यात आलेला हा टॉवर नुकसान रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा टॉवर एका अविश्वसनीय तंत्रज्ञानाची ओळख करून देत आहे. दरवर्षी जंगलातील आगीमुळे होणारी झाडे आणि पशुहानी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे हे क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन जंगल वाचविण्याचा देशातील पहिला प्रकल्प होय. देशातील पहिली AI आधारित यंत्रणा पेंच व्याघ्र प्रकल्पात बसवण्यात आली आहे. जंगलांना आगीपासून वाचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला असून अवकाशातील 15 उपग्रहांचा डेटा वापरणारी यंत्रणा यासाठी वापरण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून धूर आणि धुके यातील अंतर ओळखता येईल. या यंत्रणेला दिवस अन् रात्रीतील फरक कळतो. कुठे आणि कधी आग लागू शकते हेदेखील ही यंत्रणा सांगू शकते.