Captain Ashok Kharat News: हात बघून भविष्य सांगणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरात याचे राजकीय वर्तुळातील अनेक बडे नेते भक्त असल्याचेही समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचे व्हिएसआर कंपनीच्या मालकासोबतही हितसंबंध असल्याचा संशय राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. यावरुनच आता अमोल मिटकरी यांनीही एक महत्त्वाचा दावा केला आहे.
अजित पवारांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी जो काही संशय व्यक्त केला आहे, तो संशय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मिटकरी म्हणाले. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा लागू असताना अशा प्रकारे अघोरी पूजा झाल्याची माहिती मिळत असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
"बारामतीतील सहयोग सोसायटीसमोर, दादांच्या बंगल्यासमोर तसेच देवगिरी बंगल्यासमोर अशा प्रकारचे प्रकार झाल्याचं समजत असलं तरी या गोष्टींवर आमचा विश्वास नसल्याचंही ते म्हणाले. मात्र अघोरी विद्येचा प्रकार का केला गेला? काही लोकांना अजित पवार नकोसे झाले होते का? यामागचा मास्टरमाइंड कोण? कॅप्टन अशोक खरात यांचे काही मोठे भक्त आहेत का? असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे.
तसेच त्यांचे व्ही. के. सिंग यांच्याशी संबंध आहेत का? या सर्व गोष्टींचा एसआयटी तपासातून खुलासा झाला पाहिजे," अशी मागणीही मिटकरी यांनी केली. अघोरी पूजा आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा संबंध नाकारता येत नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांच्या या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रुपाली चाकणकरांचे नवे फोटो
दरम्यान, अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थानच्या रुपाली चाकणकर स्वतः सदस्य आहेत. रुपाली चाकणकरांचे कॅप्टन खरात सोबतचे आणखी काही फोटो समोर आलेत, ज्यामध्ये भोंदूबाबा कॅप्टन खरातने रुपाली चाकणकरांना केक भरवल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत असून नागरिकांच्या संतप्त कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
Acid Attack: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आला अन् मुलीवर ॲसिड फेकले; पाहा कसा दिसतो संगमनेरचा नराधम