Ajit Pawar Plane Crash VIDEO: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दु:खद निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. महाराष्ट्राचा लाडका दादा आपल्यात नाहीत, यावर अद्यापही अनेकांचा विश्वास बसत नाहीये. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर घटनास्थळावरील अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अजित दादांची अखेरची आठवण...!
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मीडिया जगतातून हळहळ व्यक्त होत आहे. अजित पवारांना श्रद्धांजली वाहणारे असंख्य व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत. त्यांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओही पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकजण विमान अपघाताच्या घटनास्थळी जावून पाहणी करत आहेत. सध्या बारामतीमधील एका तरुणीने घटनास्थळी जावून काढलेल्या एक व्हायरल व्हिडिओ तुफान चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अजित पवारांची शेवटची आठवण म्हणून एक अर्धवट जळालेला कागद उडत तिच्या पायाशी आल्याचे दिसत आहे.
कल्याणी पारुखे नरुटे नावाच्या तरुणीने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अजित पवार यांचा विमान अपघात झालेल्या घटनास्थळी उभी असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी पाहणी करत असतानाच एक अर्धवट जळालेला कागद तिच्या पायापाशी येतो. या कागदावर विमानाच्या चेकिंगबाबत माहिती दिली आहे. त्यावर विमानाची को पायलट शांभवी पाठकची सही देखील दिसत आहे.
तब्बल 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ
हीच ती जागा जिथे दादा सोडून गेले. दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली आणि मन एकदम गहिवरुन आले. एवढं सगळं दिसत आहे, तरीही दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही, असंही या तरुणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून आत्तापर्यंत त्याला 80 लाख व्यूव्हज मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
व्हिडिओवर अनेकांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी हा कागद जपून ठेवा, अजित दादांची अखेरची आठवण आहे, असं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या कागदावर मेन पायलट म्हणून रोहित सिंग असं नाव दिसून देत आहे. मात्र प्रत्यक्षात अजित पवार यांच्या विमानाचा कॅप्टन सुमित कपूर होता, हा बदल का झाला? असा सवालही काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world