जाहिरात

Akola News: भिंगाशिवाय टपाल तिकिटावर लिहिलं राष्ट्रगीत; अकोल्याच्या किमयागाराचा जागतिक विक्रम

Akola News : अवघ्या काही मिनिटांत त्यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं असून, त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आता देशभर होत आहे.

Akola News: भिंगाशिवाय टपाल तिकिटावर लिहिलं राष्ट्रगीत; अकोल्याच्या किमयागाराचा जागतिक विक्रम
Akola News : विनायक धांडे यांच्या या विक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ...
अकोला:


योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्याशा गावातील सुपुत्राने आपल्या कलेच्या जोरावर थेट जागतिक स्तरावर झेप घेतली आहे. जिद्द आणि एकाग्रता असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हेच एदलापूरच्या या सुपुत्राने दाखवून दिले आहे. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं असून, त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आता देशभर होत आहे.

काय केला पराक्रम?

एदलापूर येथील विनायक काशीराम धांडे यांनी चक्क एका भारतीय टपाल तिकिटावर संपूर्ण राष्ट्रगीत लिहिण्याचा अचाट पराक्रम केला आहे. हे टपाल तिकीट केवळ 2 सेंमी बाय 2.5 सेंमी इतक्या लहान आकाराचे आहे. या तिकिटाच्या मागील कोऱ्या भागावर त्यांनी राष्ट्रगीताच्या सर्व ओळी अचूकपणे उमटवल्या आहेत. 

विशेष म्हणजे, त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक अक्षराची उंची अवघी 1 मिलीमीटर इतकी सूक्ष्म आहे. इतक्या लहान जागेत संपूर्ण राष्ट्रगीत बसवणे ही एक अत्यंत कठीण आणि संयमाची परीक्षा घेणारी कला मानली जाते.

Latest and Breaking News on NDTV

भिंगाचा वापर न करता किमया

विनायक धांडे यांच्या या विक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हे सूक्ष्म लेखन करण्यासाठी कोणत्याही भिंगाचा किंवा विशेष उपकरणाचा आधार घेतला नाही. केवळ एका साध्या काळ्या बॉलपेनने त्यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. 

उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास हे शब्द अत्यंत बारीक दिसतात, मात्र जवळून पाहिल्यास त्यातील स्पष्टता आणि सुबकता लक्षात येते. सातपुड्याच्या दुर्गम भागात राहूनही त्यांनी जोपासलेली ही कला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अवघ्या पाच मिनिटांत ऐतिहासिक विक्रम

धांडे यांनी हे संपूर्ण राष्ट्रगीत केवळ 4 मिनिटे 50 सेकंद इतक्या कमी वेळात लिहून पूर्ण केले आहे. टपाल तिकिटाच्या अत्यंत मर्यादित जागेत वेळेचे भान ठेवून केलेले हे लेखन खरोखरच अद्भुत मानले जात आहे. त्यांच्या या अद्वितीय कौशल्याची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांची नोंद घेतली आहे. 

28 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना अधिकृत प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आले आहे. वयाच्या या टप्प्यावर त्यांनी मिळवलेले हे यश तरुणांसाठी मोठे प्रेरणास्थान ठरत आहे.

विनायक धांडे यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रगीताला अशा अनोख्या पद्धतीने जगासमोर मांडता आले, याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दुर्गम भागातील व्यक्तीही आपल्या कलेने जगाचे लक्ष वेधून घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे विनायक धांडे यांचा हा प्रवास आहे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com