योगेश शिरसाट,अकोला
अकोल्याच्या (Akola News) सांगवी खुर्द गावांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाने जून महिन्यात अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियम येथे देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामंक मंडळ (BCCI Umpire Exam) अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत पंच पॅनलमध्ये देशातून पहिला येण्याचा बहुमान मिळवलाय. एकंदरीत हलाखीच्या परिस्थितीत ग्रामीण भागातून मराठी शाळेत शिक्षण घेतलं असतानाही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्यांनी गावासह देशभरात जिल्ह्याचे बहुमान पटकवत क्रिकेटमध्ये नाव कोरलं आहे.
पवन हलवणे हा श्रीकृष्ण हलवणे या अल्पभूधारक कोरडवाहू पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा. एकीकडे अकोला हा जिल्हा शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या आत्महत्येसाठी ओळखला जातो. मात्र पवनने डगमगला नाही. त्याने सतत वीस वर्षे मेहनत करून यशाचं शिखर गाठलं. श्रीकृष्ण हलवणे यांना पत्नी मीरा यांच्यासह शिवाली व प्राची अशा दोन मुली आणि पवन एकुलता एक मुलगा आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याला अनेकदा कठीण सामना करावा लागतो.. मात्र पवनने अत्यंत कठीण परिस्थितीतही ही परीक्षा उत्तीर्ण केली. पवन याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. सपनाच्या साथीने पवनने सतत परिश्रम घेत बीसीसीआय पॅनल पंच परीक्षेत देशासह विदर्भात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
नक्की वाचा - Ashadhi Ekadashi 2025: 'महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी', CM फडणवीस यांचं विठुरायाला साकडं
बीसीसीआय पंच परीक्षेत अकोल्याचा शेतकऱ्यांचा मुलगा हलवणे अव्वल ठरलाय. अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या बीसीसीआय पॅनल पंच परीक्षेत विदर्भाचे अकोला जिल्ह्यातील सांगवी खुर्द गावचे पवन हलवणे अव्वल ठरले आहेत. हलवणे यांच्यासोबतच विदर्भाचे आणखी एक पंच विक्रांत देशपांडे यांनीही ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दरम्यान, संपूर्ण भारतातील 150 उमेदवारांपैकी फक्त 26 जणांची निवड झाली असून 150 गुणांच्या परीक्षेत लेखी परीक्षा, प्रेझेंटेशन आणि ऑन फील्ड परीक्षा समाविष्ट होती. अकोल्याच्या शेतकऱ्याचा मुलगा पवन हलवणेने सर्वाधिक 147.5 गुण मिळवले तर देशपांडेने 130 गुण मिळवले. बीसीसीआय आयोजित केलेल्या पात्रता परीक्षेत बसल्यानंतर विदर्भातील चार जणांची बीसीसीआय परीक्षेसाठी निवड झाली. एकंदरी महिला-पुरुष उमेदवारांमध्ये सोनिया राजोरिया आणि नामा खो-ब्रागडे यांनी मॅच रेफरी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) अधिकाऱ्यांनी पंचांचे परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
पवनच्या मेहनतीला यश...
वयाच्या 12 व्या वर्षापासून पवन सांगवी खुर्द येथून अकोल्यात नियमित अकोला क्रिकेट क्लब येथे सराव करून सोळा वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. यासोबतच अमरावती विद्यापीठ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करून शालेय खेळाडूंना प्रशिक्षण सुद्धा त्यांनी दिले. सुरुवातीला पंच म्हणून अकोला क्रिकेट क्लब यानंतर विदर्भातील व्हीसीएच्या स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. पवन हलवणेच्या या उत्तुंग यशाबद्दल अकोला क्रिकेट क्लब कार्यकारणी कडून पवनचे कौतुक केले जात आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा पवन हलवणे यांनी देशात केलेल्या सर्वोत्तम कामगिरी अकोला क्रिकेट क्लब आणि जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे..